मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात सोमवारी (दि. ३०) सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील २५ गावांतील पाच हजार ८९० शेतकऱ्यांचे चार हजार ९८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, तालुक्यातील वनपट येथे वादळी पावसात भिंत कोसळून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करीत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी दिला. सोमवारी दुपारपर्यंत कडक उन्हाचा तडाखा असताना सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सायंकाळी आकाश ढगाळले आणि विांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली.
या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, भाजीपाला तसेच डाळिंब यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर आडवी झाली. काढणीच्या हंगामात आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील वनपट येथे वादळी पावसात भिंत कोसळून यश प्रवीण शिंदे (१४) याचा मृत्यू झाला. तसेच परिसरातील ८ ते १० घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी तालुक्यातील ढबळेश्वर व पांढरूण आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. ढवळेश्वर येथे समाधान पवार यांच्या कांदा पिकाची, पांढरूण येथे सुरेश चव्हाण यांच्या कांदा, डाळिंब व मका पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी मंत्री भुसे यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांना तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
दहा दिवसांत तिसरे संकट
गेल्या दहा दिवसांत मालेगाव परिसरात अवकाळी पावसाचे हे तिसरे संकट ठरले आहे. यापूर्वी दि. १९ व २० मार्च रोजी झालेल्या पावसामुळे १७ गावांतील पिकांचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले होते. त्यातच पुन्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढले असून, तातडीने मदतीची मागणी होत आहे.