मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मालेगाव शहरात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, तापमानाने चाळिशी गाठली आहे. शनिवारी (दि. १४) शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची लाही लाही होत असून, दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. दि. १ मार्चपासून वातावरणात लक्षणीय बदल जाणवत आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत मंगळवारी तापमानात आणखी वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील बाजारपेठा आणि रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाय केले जात आहेत. शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या पाणपोया नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून, प्रवासी व कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक येथे पाणी पिऊन तहान भागवत आहेत.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेत थंड पेये, लिंबू सरबत, उसाचा रस यांची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर उन्हापासून संरक्षणासाठी उपरणे, टोपी, गॉगल तसेच बागायती रुमाल खरेदीकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.
तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, हलके व सैल कपडे परिधान करावेत तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाचा तीव्रपणा लक्षात घेता अनेक नागरिकांनी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा कामे उरकण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी सायंकाळी पाच नंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.