मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी ११ उमेदवार जाहीर केले आहेत. यात दोघा महिलांसह चार मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यात एका दाम्पत्याचा समावेश आहे.
शिवसेना (उबाठा) गटाला पश्चिम भागातील ५ प्रभागातील २० जागाही लढवणे शक्य झाले नाही. त्यावरून या पक्षाची बिकट स्थिती लक्षात येते. येथे पक्षाने महाविकास आघाडीची मोट करण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसचा त्यात समावेश नाही. काँग्रेस 'एकला चालो रे' या वृत्तीप्रमाणे स्वतंत्र निवडणुका लढवत आहे.
शिवसेनेतील राज्यस्तरीय फुटीनंतर मालेगाव तालुक्यातील शिवसेना नेते दादा भुसे यांच्यासह ९० टक्के कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेची वाट धरली. यामुळे उद्धव ठाकरे गटाची अवस्था बिकट झाली होती. स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीमुळे तत्कालीन भाजपनेते अद्वय हिरे यांनी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला.
प्रवेशाची बिदागी म्हणून त्यांना मानाचे उपनेते पद बहाल करण्यात आले. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी ही देण्यात आली. तथापि दादा भुसे यांच्या विरोधात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर मतदानाच्या बाबतीतही तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
काळाची पावले व समर्थकांचा आग्रह लक्षात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्वय हिरे यांनी पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाची परिस्थिती पुन्हा दयनीय झाली.
बिकट परिस्थितीत तालुकाप्रमुख जितेंद्र देसले व ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते कैलास तिसगे यांनी पक्षाची धुरा सांभाळली. या दोघांच्या पुढाकारानेच पक्षाने महापालिका निवडणुकीत ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. ग्रामीण जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख जितेंद्र देसले यांनी या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.
उबाठाचे उमेदवार कंसात प्रभाग
कविता पाथरे (प्रभाग १ अ), गणेश गायकवाड (प्रभाग १ ड), पुंडलिक वाणी (प्रभाग २ ड), शहा निहाल (प्रभाग ३ ब), बीबी मरियम (प्रभाग ५ ब), मोहम्मद रफीक अब्दुल रशीद (प्रभाग ५ ड), कोकिळा तिसगे (प्रभाग ९ ब), कैलास तिसगे (प्रभाग ९ड), तृप्ती सोनवणे (प्रभाग १० क), आसिफ शेख (प्रभाग १० ड), पंकज पाटील (प्रभाग ११ ड).