मालेगाव : महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. १३) शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमध्ये जोरदार प्रचारफेऱ्या काढत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. काही उमेदवारांनी घराघरांत जाऊन वैयक्तिक गाठीभेटी घेत मतदारांसमोर आपली भूमिका मांडली. पंधरवड्यापासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी (दि. १३) सायंकाळी थंडावला. आता सर्वच पक्षांचे लक्ष दि. १५ रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या एकूण ८४ जागांसाठी २१ प्रभागांतून निवडणूक होत आहे. यापैकी प्रभाग क्रमांक ६ मधून एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ८३ जागांसाठी तब्बल ३०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी न मिळाल्याने विविध राजकीय पक्षांतील अनेक नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.
आमदार, माजी आमदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सहज उमेदवारी दिली जाते, मात्र पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना डावलले जाते, असा आरोप करत नाराज अपक्ष उमेदवारांनी उघडपणे पक्ष नेतृत्वाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचा फटका पक्षांना बसू नये म्हणून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून काही बंडखोरांची साम-दाम-दंड या नीतीने समजूत काढण्यात आली. मात्र, तरीही काही उमेदवारांनी माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अनेक उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये दणकेबाज प्रचार फेऱ्या काढत शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशे, वाहनांच्या ताफ्यांसह मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यंदाची महापालिका निवडणूक चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, प्रचार संपल्यानंतर आता उमेदवार आणि कार्यकर्ते मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी बाहेर कसे आणता येईल, यासाठी आखणी करताना दिसत आहेत. दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानातून मालेगावकर कोणाला कौल देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
८३ जणांवर हद्दपारीची कारवाई
मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पार पडावी यासाठी शहरातील गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या ८३ जणांवर हद्दपारीची, तर ७२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सात फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेदरम्यान पोलिसांतर्फे दारूबंदी कायद्याखाली ७९ कारवाया करून त्यात तीन लाख ७२ हजार ९९१ रुपयांची एक हजार ९९ लिटर दारू पकडण्यात आली.
अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत दोन कारवायांत ७५ ग्रॅम एमडी पावडर, चार किलो भांग असा सहा लाख ४५ हजारांचा मुद्देमाल, अवैध गुटखा कारवाईत ४६ लाख ३३ हजार ६४२ रुपयांचा एक हजार ५७५ किलो गुटखा व भारतीय हत्यार कायद्यान्वये दोन गावठी पिस्तुले, आठ काडतुसे, चार चाकू, सात तलवारी व दोन इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
नागरिकांनी मतदान केंद्रांवर विनाकारण गर्दी करू नये, मतदारांना पैशाचे आमिष दाखवू नये, बोगस मतदान करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळसाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी केले.