

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात गेल्या वेळी निवडून आलेल्या 122 पैकी तब्बल 87 माजी नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमत आहेत. या माजी नगरसेवकांनी आपल्यासोबत त्यांच्या 27 नातलगांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सर्वाधिक 38 माजी नगरसेवक हे भाजपकडून रिंगणात असून, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट असून शिंदे गटाकडून 30 नगरसेवक निवडणूक रिंगणात आहेत.तर सहा माजी नगरसेवक अपक्ष म्हणून मतदारांसमोर गेले आहेत.
महापालिका निवडणुकीत ज्या माजी नगरसेवकांना पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आपल्या नातलगांनाच निवडणुकीत उतरवले आहे. माजी नगरसेवक तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे 27 नातलग या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात मुलगा, मुलगी, स्नुषा, पत्नी, पती तसेच पुतण्या यांचा समावेश आहे.यात माजी महापौर विनायक पांडेची सून अदिती पांडे, बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी महापौर अशोक दिवेंचे पुत्र राहुल आणि प्रशांत दिवे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील,माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी, माजी महापौर वसंत गितेंचे पुत्र प्रथमेश गिते यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
तीन माजी महापौरांसह 44 माजी नगरसेविका मनपाच्या रिंगणात
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून 44 माजी नगरसेविका निवडणूक लढवत आहे. याशिवाय रंजना भानसी, नयना घोलप व अशोक मुर्तडक हे तीन माजी महापौरदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर अन्य पाच माजी महापौरांचे नातलगही यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. यापैकी कोण बाजी मारतो, याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
पाच माजी महापौरांचे नातलग निवडणुकीत
मनपा निवडणुकीत माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र राहुल दिवे, वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी, ॲड. यतीन वाघ यांची पत्नी हितेश वाघ, विनायक पांडे यांची स्नुषा आदिती पांडे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी दिवे आणि गिते हे दुसऱ्यांदा निवडणुकीत आपले नशीब आजमवणार आहेत.