Nashik COVID ICU Bed Scam : डॉ. निखिल सैंदाणे यांना पोलिस कोठडी
नाशिक : कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू बेड (अतिदक्षता विभाग) उभारण्यात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी व मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे यांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सरकारवाडा पोलिसांत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणी डॉ. निखिल सैंदाणे यांना सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (ता. 12) सायंकाळी विनयनगर येथील राहत्या घरातून अटक केली. मंगळवारी (ता.13) न्यायालयासमोर हजर केले असता, डॉ. सैंदाणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोविड काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात 30, मालेगाव सामान्य रुग्णालयात 10 खाटांचे आयसीयू (अतिदक्षता विभाग) तयार करण्याचे कंत्राट घेतलेल्या सीपीपीएल (मे. क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा.लि.) या बनावट कंपनीने 12 कोटींना गंडा घातला आहे. याच कंपनीने राज्यभरातील शासकीय रुग्णालयांची कंत्राटे घेत सुमारे 40 ते 50 कोटींची शासनाची फसवणूक केल्याची शक्यता आहे.
15 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (55), तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सौंदाणे (45), तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया (50), औषधनिर्माण विभागातील फार्मासिस्ट शिरीष माळी (58), डॉ. राहुल हडपे (45), सागर दिलीप चोथवे (30), अश्विनी सागर चोथवे (28), दिलीप राणूजी चोथवे (55) या संशयितांविरोधात गेल्या 15 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

