Malegaon Municipality मालेगाव महापालिका Pudhari News Network
नाशिक

Malegaon Municipal Corporation| काहींनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण

Malegaon Municipal Corporation| काहींनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला बुधवारी (दि. १) प्रारंभ झाला. महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) ते जाफरनगर या मार्गावर पहिल्या दिवशी व्यापक कारवाई करण्यात आली. शिवतीर्थ ते दरेगाव दरम्यान प्रभाग २ व ३ हद्दीत सुमारे ३०० ते ४०० कच्च्या व पक्क्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य तीन वाहनांतून जमा करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने यापूर्वी २४ मार्च रोजी झालेल्या बैठकीत अतिक्रमण मोहीम राबविण्याचे संकेत दिले होते. तसेच अतिक्रमणधारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. कोणतीही स्वतंत्र नोटीस न देता मोहीम राबविण्यात येणार असल्याने काही अतिक्रमणधारकांनी बुधवारी स्वयंस्फूर्तीन आपली अतिक्रमणे हटविल्याचे दिसून आले.

मोहिमेदरम्यान उपायुक्त डॉ. सुनीता कुमावत, सहायक आयुक्त धोंडगे, अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार, प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल, मोहम्मद इरफान, संतोष गायकवाड, सहायक नगररचना अधिकारी गणेश माळी तसेच बांधकाम, नगररचना व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, महापालिकेने गुरुवारी (दि. २ एप्रिल) नवा बसस्थानक ते द्याने कमान या मार्गावर अतिक्रमणविरोधी कारवाई राबविण्याचे नियोजन केले असून, ही मोहीम पुढील काही दिवस टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेदरम्यान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. या कारवाईसाठी २ जेसीबी, २ डंपर, २ ट्रॅक्टर तसेच ४ अतिक्रमण हटविणारी वाहने वापरण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाचे २० ते २५ कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय महानगरपालिकेचे सुमारे ९० ते १०० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात ही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT