Malegaon Municipal Corporation 
नाशिक

Malegaon Municipal Corporation | 'इस्लाम' ची बाजी; रणनीती यशस्वी

Malegaon Municipal Corporation | महानगरपालिका, दोन राजकीय घराण्यांची युती अन् काम फत्तेह

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : प्रमोद सावंत

महानगरपालिकेत अपेक्षेप्रमाणे इस्लाम पार्टीच्या नसरीन खालीद शेख यांची महापौर, तर समाजवादी पार्टीच्या शानेहिंद निहाल अहमद यांची उपमहापौरपदी निवड झाली. मनपात रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावर महिलाराज प्रस्थापित झाले. अल्पसंख्याकबहुल शहरातून महिलांचा 'हम भी कुछ कम नहीं' असा संदेश दिला गेला.

दोन प्रमुख पक्ष व राजकीय घराण्यांतील युतीने काम फत्तेह केले. इस्लामची मनपा निवडणुकीची सुरुवात जोरदार अन् सुखद शेवट झाला. सत्तारूढ गटाला सहकारी नगरसेवकांचा सन्मान, प्रबळ विरोधकांचा मुकाबला व शहर विकासाचे शिवधनुष्य पेलावे लागेल. मनपाच्या दोन दशके आणि तत्कालीन नगरपालिकेच्या नजीकच्या अर्धशतकांच्या इतिहासात शहरातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या या संस्थेवर येथील पूर्व भागातील तीन राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले.

या घराण्यांतील वेगवेगळ्या सदस्यांनी आलटून पालटून नगराध्यक्ष, महापौर व स्थायी समिती सभापती ही सर्वोच्च महत्त्वाची पदे उपभोगली आहेत. महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीतही या तीन घराण्यांवर निवडणूक केंद्रित झाली होती. ही परंपरा सुरू असतानाच शहरातील पारंपरिक दाणी, मोमीन वाद संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. हे ओळखून 'इस्लाम'चे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी राजकीय मतभेद वाजूला ठेवून समाजवादी पार्टीशी निवडणूकपूर्व युती करीत मालेगाव सेक्युलर फ्रंट आघाडी केली.

शहरातील राजकीय, सामाजिक स्थिती पाहता, यातून दखनी मोमीन एकीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. ही दोन प्रमुख राजकीय घराणी एकत्र आल्याने, 'इस्लाम'च प्रचाराचे सुयोग्य नियोजन, बंडखोरी शमविण्यात आलेले यश, शेख कुटुंबातील एकोपा, सुरुवात ते शेवटपर्यंतची माजी आमदार आसिफ शेख यांची यशस्वी रणनीती या जोरावर या फ्रंटने ४० जागा मिळविल्या.

वडील माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर आसिफ शेख यांनी स्वबळावर ३५ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. आजवर शहरातीलराजकीय धुरंधर म्हणून ओळखलेल्या व राज्याचे विरोधी पक्षनेते पद भूषविलेल्या निहाल अहमद वगळता हा करिश्मा करून दाखविणे कोणालाही शक्य झाले नव्हते. मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत निहाल अहमद यांनी स्वबळावर सत्ता हस्तगत केली होती.

त्या पार्श्वभूमीवर वडील रशीद शेख यांच्या एक पाऊल पुढे टाकत आसिफ यांनी मिळविलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. त्याच वेळी दखनी - महाराष्ट्रीयन समाजाच्या नसरीनबानो शेख महापौर व मोमीन अन्सारी समाजातील शानेहिंद निहाल अहमद यांना उपमहापौर करून पूर्व भागातील दखनी - मोमीन संतुलन राखण्यात मालेगाव सेक्युलर फ्रंटने यश मिळविले.

पूर्व भागात एमआयएम व आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल हेच आसिफ शेख यांचे प्रमुख विरोधक असल्याने त्यांनी शहर विकासाच्या नावाखाली २१ जागा मिळविलेल्या एमआयएम व पश्चिमेस १८ जागा मिळवून दणदणीत विजय मिळविलेल्या शिवसेनेने बिनशर्त पाठिंवा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

तथापि तह व युती खेळात पदांची वाटणी, चर्चा व आर्थिक उलाढाली यांशिवाय काही शक्य नाही याची जाणीव ठेवून दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांना हाताशी ठेवण्याचा प्रयत्न होता. त्यातही शिवसेनेशी युतीला त्यांचे प्राधान्य होते. मात्र येथील त्रिशंकू स्थितीमुळे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री दादा भुसे यांना पक्षाचा महापौर होईल का पाहा असा संदेश दिला अन् युतीचे घोडे अडले ते पुढे सरकले नाही.

यातून सावध होत आसिफ शेख यांनी ३ सदस्य असलेल्या काँग्रेसला जवळ केले. स्वपक्षीय मंत्री भुसे यांच्या कट्टर समर्थक असलेल्या दोन नगरसेवकांनी बंड करू नये याचीही काळजी घेतली. या घडामोडीत त्यांना समाजवादी पार्टीचे मुश्तकीम डिग्रिटी यांचीही खंबीर साथ लाभली. ते विरोधकांच्या गळाला लागले नाहीत.

काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे फ्रंटला बहुमतासाठी ४३ चे संख्याबळ झाले. खबरदारी म्हणून हे गणित जुळण्यापूर्वीच स्वपक्षातील नगरसेवक पर्यटनाला पाठविले. विरोधी शिवसेनेचे गणित जुळेना, जोखीम घेत एमआयएमला सोबत घेऊनदेखील ३९ संख्याबळ होते.

भाजप मित्रपक्ष असतानाही येथील विरोधक असल्याने त्यांचे दोन सदस्य सोबत येणे शक्य नव्हते. यामुळे शिवसेनेने औपचारिकता म्हणून निवडणूक लढविली. मालेगाव सेक्युलर फ्रंटचा विजय सुलभ झाला. 'इस्लाम'ने बाजी मारली तर खरी पण, काठावरचे बहुमत असल्याने सत्ता सांभाळताना कसरत करावी लागेल.

स्थायी समितीतही अशीच स्थिती राहील. विरोधकांचेही सात ते आठ सदस्य असतील. समितीचे सभापतिपद कॉंग्रेसकडे असेल. सत्ता समतोल राखतानाच प्रबळ विरोधक असलेल्या एमआयएम व शिवसेनेशी मुकाबला करीत शहर विकास साधावा लागणार आहे. आव्हानांचा हा डोंगर 'इस्लाम' कशा पद्धतीने सर करणार यावरच त्यांचे भविष्य ठरणार आहे,

पती-पत्नी, बेटा और बहू

दोन दशकांत महापालिकेत आठ महापौर झाले. त्यापैकी चार महापौर या एका घराण्यातील झाले. माजी आमदार रशीद शेख त्यांच्या पत्नी ताहेरा शेख व पुत्र आसिफ शेख यांनी यापूर्वी महापौरपद भूषविले. ताहेरा शेख यांना तर दोनदा संधी मिळाली. आता २०२६ मध्ये रशीद शेख यांच्या सून नसरीनबानो खालीद शेख शहराच्या नवव्या महापौर झाल्या आहेत.

रशीद शेख नगराध्यक्षही होते. याच परिवारातील रशीद शेख यांचे बंधू जलील शेख यांनी स्थायी समितीचे सभापतिपद भूषविले होते. माजी नगराध्यक्ष व महापौर निहाल अहमद यांच्या कन्या शानेहिंद निहाल अहमद या उपमहापौर झाल्या. मागील सभागृहात शानेहिंद या विरोधी पक्षनेत्या तथा महागठबंधनच्या गटनेत्या होत्या.

यापूर्वी निहाल अहमद यांनी नगराध्यक्ष व महापालिका निर्मितीनंतर प्रथम महापौरपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी साजेदा निहाल अहमद यांनी नगराध्यक्ष व महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतिपद दोन वेळा भूषविले आहे. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग अजिज बेग हे यापूर्वी नगराध्यक्ष होते. महापालिका स्थायी समितीचे सभापतिपद त्यांनी भूषविले आहे. आता पुन्हा एकदा त्यांना पाठिंब्याच्या मोबदल्यात स्थायी समितीचे सभापतिपद मिळणार आहे.

शिवसेनेला अट्टाहास नडला

महापालिकेतील त्रिशंकू परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वावर पक्षाचा महापौर करावा यासाठी रेटा लावला. हा प्रस्ताव शिवसेनेने 'इस्लाम 'शी चर्चेत मांडताच इस्लामचे पदाधिकारी चमकले. इस्लाम महापौर पदावर ठाम राहिले. याउलट शिवसेनेने दूसरे काही करता येते का याची चाचपणी करून पाहू, असे म्हणत प्रयोग केले.

त्यातच वेळ निघून गेली अन् अट्टाहास नडला, गेम बिघडला. शिवसेनेच्या यावेळी सर्वाधिक विक्रमी १८ जागा येऊनही त्यांना सत्तेबाहेर राहावे लागणार आहे अन्यथा 'इस्लाम 'शी युती केल्यास उपमहापौरपद शिवसेनेला हमखास मिळणार होते. मालेगाव सेक्युलर फ्रंटचे ४० व शिवसेनेचे १८ असे भक्कम पाठबळही सत्तारूढ गटाच्या पाठीशी राहिले असते.

शिवाय राज्य शासनाकडील कामे करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांचा हातभार लागला असता. 'इस्लाम'ला याची जगीणव होती. मात्र, शिवसेनेची भूमिका तर्कसंगत नव्हती. एमआयएमने आपल्याकडे महापौर पदासाठी प्रबळ उमेदवार नसल्याचे निकालानंतरच जाहीर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT