Nashik Tree Cutting Ban
संपूर्ण जिल्हाभरात वृक्षतोडीला अंतरिम स्थगितीpudhari photo

Nashik Tree Cutting | नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ; संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच

Nashik Tree Cutting | मनपा उद्यान विभाग निद्रिस्त : महापौर, उपमहापौरांनीच घ्यावी दखल
Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना संरक्षित दर्जा देताना, तोडण्यास सक्त मनाई केल्यानंतरही निसर्गसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच आहे. आश्चर्य म्हणजे वृक्षप्रेमींकडून महापालिकेच्या उद्यान विभागाकडे यापूर्वीच याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, उद्यान विभाग निद्रिस्त अवस्थेत असल्याने, आता नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांनीच या प्रकाराची गंभीर दखल घेऊन उद्यान विभागाची कानउघडणी करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे. भद्रकालीतील घास बाजारात दररोज पिंपळ, वड आणि औदुंबर या वृक्षांच्या फांद्या टेम्पो भरून विक्रीसाठी आणल्या जातात. शहरातील बहुतांश वृक्षांची दररोज छाटणी केली जात असल्याने, अनेक वृक्ष पानांविना अखेरच्या घटका मोजत आहेत. वडाळा रोड, इंदिरानगर या भागातील मांसविक्रेत्यांना या वृक्षांचा पाला विकला जातो. त्यामुळे या भागातील मांसविक्रीच्या दुकानात हमखास औदुंबर वृक्षाचा पाला नजरेस पडतो. हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असून, याबाबत काही वृक्षप्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींची महापालिकेच्या उद्यान विभागाने एकदाही दखल न घेतल्याने, वृक्षांची छाटणी करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. दरम्यान, महापालिका उद्यान विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे या संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. तक्रारीनंतरही अधिकारी तसेच कर्मचारी कारवाई करीत नसतील तर यामागे काही साटेलोटे आहे काय? असा संशय आता वृक्षप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

पिंपळ, वड आणि औदुंबर या तिन्ही वृक्षांना भारतीय संस्कृतीत विशेष मान आहे. पर्यावरण साखळीत या वृक्षांचे विशेष महत्त्व असल्याने, त्याचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याबाबतचे संबंधित विभागाने आदेशित केले आहे. मात्र, अशातही उद्यान विभाग कारवाई करीत नसल्याने, न्यायालयाच्याच आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news