मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
काढणीच्या उंबरठ्यावर असलेले सोन्यासारखे पीक काही क्षणांत राखेत परिवर्तित झाले आणि शेतकऱ्याचे वर्षभराचे स्वप्न अक्षरशः जळून गेले. तालुक्यातील कजवाडे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३० आर क्षेत्रातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेतकरी महेंद्र लहू सूर्यवंशी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
कजवाडे येथील गट क्रमांक २२९/१ मधील सूर्यवंशी यांच्या शेतातील गहू पीक काढणीस पूर्णपणे तयार झाले होते. पिकावर शेवटची नजर टाकत काढणीची तयारी सुरू असतानाच अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडली आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि पाहता पाहता संपूर्ण गव्हाचे पीक जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच तलाठी अमोल पगार तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल तयार केला. दरम्यान, काढणीस आलेले संपूर्ण पीक नष्ट झाल्याने सूर्यवंशी यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने पंचनाम्याच्या आधारे तातडीने नुकसानभरपाई देऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हवामान अंदाजाने केला घात
हवामान खात्याने बुधवार (दि. १८) पासून पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे काढणीला आलेले गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून मशीन मागवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र मागणी वाढल्याने मशीन उपलब्ध होत नव्हते. त्यातच शेताजवळील डीपीजवळ शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या थेट उभ्या पिकावर आल्या आणि क्षणार्धात सर्व काही जळून खाक झाले.
मागील वर्षीही ३५० ते ४०० क्विंटल कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला होता. त्यावेळी जवळपास ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले होते, मात्र शासनाकडून केवळ १० हजार रुपयांची तुटपुंजी मदत मिळाली होती. आता पुन्हा असेच नुकसान झाल्याने आम्ही पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशी व्यथा शेतकरी महेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा महावितरण व संबंधित तलाठी करतात. महावितरणकडून पंचनाम्याचा अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर नुकसानाचे योग्य मूल्यांकन करून पुढील कार्यवाही केली जाईल.- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी