नाशिक : नववर्षाची सुरुवात मांगल्याच्या मकरसंक्रांत या सणाने होत असल्यामुळे या सणाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो. म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धाकडे वळतो. ज्योतिष मान्यतेनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवसापासून ऋतू परिवर्तनास सुरुवात होते. मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत तिळगुळाची देवाणघेवाण केली जाते.
या काळात शरद ऋतू क्षीण होत वसंत ऋतूचे आगमन होते. त्यामुळे दिवस हळूहळू मोठे होत जातात, तर रात्र छोटी होत जाते. तिळाचे महत्त्व अधोरेखित करणारा मकरसंक्रांत सण सामाजिक सलोखा आणि गोडीचे नाते जपण्याचा संदेश देतो. नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजारी यांच्यात आपुलकीने शुभेच्छा दिल्या जात असून, सण उत्साहाने सर्वत्र साजरा केला जात आहे. या दिवशी केलेली पूजा ही आरोग्य, समृद्धी आणि पुण्यप्राप्ती करून देते, अशी श्रद्धा आहे.
संक्रांतीचा सण आणि हळदी-कुंकवाच्या सोहळ्याला आधुनिकतेची सांगड घालून वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा करण्याची पद्धत सुरू झाल्यामुळे संक्रांतीचे वाण लुटण्याचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी घेतला जात आहे. भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्त्व असून, ऋषिमुनींनी आणि पूर्वजांनी वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून समाजपरिवर्तन, अध्यात्म आणि विचारांची देवाणघेवाण केलेली असल्याने हळदी-कुंकवाच्या माध्यमातून ठिकठिकाणी महिला एकत्र येऊन त्यातून त्यांच्यात संवाद, स्नेहाची आणि सहभागाची संधी साधली जात आहे.
संक्रांतीचे वाण आणि आनंदाचा सोहळा
सर्वत्र निवडणुकीचे वातावरण असले, तरी मकरसंक्रांतीच्या भोगी, कर व संक्रांत हे दिवस साजरे करण्यासाठी पतंग आणि पतंगातच रममाण होत असल्याचे चित्र शहर परिसरात दिसत आहे. त्यामुळे गल्लोगल्ली बच्चेकंपनीचा ‘बढाव’, ‘ढिल दे’, ‘वकाट’ असे शब्द क्षणोक्षणी वाढत आहेत. मांजावर मांजा पडून होणारा ‘पेच’, पतंग काटाकाटीसाठी रंगणारा खेळ उत्सवाची खासियत होताना दिसत आहे, तर संक्रांतीचा सण आणि त्याबरोबरच पहाटेच सुगडाची पूजा करून सौभाग्याचे लेणे म्हणून संक्रांतीचे वाण देऊन हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी महिलांची लगबगही सुरू झाली आहे, तर लहानग्यांचे बोरन्हाण केले जात आहे. मुलांवर केला जाणारा हा महत्त्वाचा शिशुसंस्कार असून, निसर्गाशी आणि बदलत्या ऋतूंशी बाळाची नाळ जोडण्यासाठी हा सण साजरा केला जात असतो.
नवीन सुनेचे लाड सासूबाईने करावे यासाठी मकरसंक्रांतीपासून हळद-कुंकवाचा कार्यक्रम घेतला जातो. हळद-कुंकू आता इव्हेंट झाला असून, संक्रांतीचे वाण लुटण्यासाठी 15 प्रकारचे बटवे, नवविवाहितांसाठी हळदी-कुंकू वाणासाठी लागणाऱ्या हॅण्डमेड वस्तू ज्यामध्ये सौभाग्य कलश, कापडी फुलांचे तोरण, आकर्षक बॅग्ज, ज्वेलरी बॉक्स, मोत्याच्या रांगोळ्या अशा विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.सोनाली जाधव
यंदाच्या मकरसंक्रांतीला एकादशीही आहे. असा दुर्मीळ योग 23 वर्षांनंतर आलेला आहे. असा योग पुन्हा 2045 मध्ये येणार आहे. एकादशी आणि मकरसंक्रांत असे दुर्मीळ योग यापूर्वी 1985, 2003, 2004, 2026 आहे. ही मकरसंक्रांती सिंह आणि कन्या राशीसाठी विपुल संपत्तीदायक अशी आहे, तर तूळ आणि वृश्चिक राशींना प्रवासाचा योग आहे.डॉ. नरेंद्र धारणे, धर्म-ज्योतिष तज्ज्ञ