

सिल्लोड : सिल्लोड तालुका पंचायत समितीच्या प्रांगणात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली तालुक्याची आमसभा म्हणजे प्रशासनातील ढिसाळपणा, भष्टाचार आणि जनतेच्या साचलेल्या रोषाचा ज्वालामुखी ठरली. आमसभेत सामान्य जनतेच्या व्यथा, प्रश्न व तक्रारींचा अक्षरशः उद्रेक झाला. मात्र या प्रश्नांना केवळ ऐकून न घेता त्यावर ठाम भूमिका, तातडीचे आदेश आणि न्यायाची हमी देत सर्वसामान्यांच्या कामांसाठी प्रशासनाने ह्लगर्जी पणा करू अशी तंबीच माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांना आमसभेत दिली.
सत्तेचा उद्देश सेवा आणि न्याय; दिरंगाईला येथे जागा नाही, असा ठाम सूर लावत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली, मात्र त्यानंतर जनतेच्या प्रश्नांचा अक्षरशः पाढाच उलगडला. तालुक्यातील विविध गावांतील ग््राामस्थांनी शिक्षण, आरोग्य, घरकुल, मनरेगा, पाणीपुरवठा, वीज वितरण, रस्ते, अंगणवाडी, स्वच्छता, सिंचन, महिला बचतगट, शासकीय जमिनींचा गैरवापर, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पैशाच्या मागणीबाबत गंभीर आरोप केले.
जनतेच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना माफी नाही, असा कडक इशारा देत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.अजिंठा, उंडणगाव, पालोद-डोंगरगाव, घाटनांद्रा, अंधारी आदी भागांतील ग््राामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीवर आमदार सत्तार यांनी सखोल चर्चा घडवून आणली.
अर्जुन गाढे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, विश्वासराव दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, डिवायएसपी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नायब तहसीलदार शेख हारून, पोलीस निरीक्षक शेषराव उदार उपस्थित होते.
अनेक गंभीर बाबींनी सभेत खळबळ उडवली
घरकुल योजनेत पात्र लाभार्थींना डावलून एकाच कुटुंबाला लाभ दिल्याचे प्रकार, मनरेगा कामांतील गैरव्यवहार, नदी-नाले खोलीकरणात लाखो रुपयांची उचल, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रखडलेले गेट, सातबारा उताऱ्यात परस्पर नावे वगळण्याचे प्रकार अशा अनेक गंभीर बाबींनी सभेत खळबळ उडवली. कबस्तान, स्मशानभूमी, समाजमंदिर, सामाजिक सभागृह, वाचनालय, क्रीडांगण यासारख्या शासकीय मालमत्तांची तात्काळ नोंद घ्या. अशा सूचना आ. अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिल्या.