Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | महावितरणची सिंहस्थ कामे अवघी 39 टक्के

Nashik Simhastha Kumbh Mela | उपकेंद्रे, भूमिगत वाहिन्या, रोहित्र त्यांच्या क्षमतावाढीला वेग; काही कामे प्राथमिक टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्या अनुषंगाने महावितरणने भाविकांना वीजपुरवठा अभावाने कुठल्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये, म्हणून वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी विविध कामे हाती घेतले आहेत.

नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी, भूमिगत वाहिन्या, रोहित्रांची क्षमतावाढ, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामांचा यात समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नमूद केलेल्या १५ कामांची प्रगती ३८.६१ टक्के आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
नवीन कामांमध्ये नाशिक शहरातील गोदापार्क (जीआयएस) उपकेंद्रासाठी माती परीक्षण, इलेक्ट्रिकल लेआऊट आणि कंट्रोल रूमचे खोदकाम पूर्ण झाले आहे. भद्रकाली जीआयएस उपकेंद्रातील पाइल फाउंडेशन आणि बोअरवेलचे काम पूर्ण झाले असून, ३३ केव्ही भूमिगत वाहिनीचे काम ८१ टक्के आणि ११ केव्ही वाहिनीचे काम २२ टक्के झाले आहे.

नांदूर-मानूर उपकेंद्रात नियंत्रण कक्ष, ऊर्जा रोहित्राचा पाया आणि स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. ३३ केव्ही वाहिनीचे काम ४८ टक्के, ११ केव्ही उपरी वाहिनीचे काम ७८ टक्के, तर ३३ केव्ही भूमिगत वाहिनीचे काम ४१ टक्के झाले आहे.

कुंभमेळ्यासाठी महावितरणची कामे

  • नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रे

  • अतिरिक्त ऊर्जा रोहित्रांची उभारणी

  • उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे भूमिकतीकरण

  • शाहीमार्गाचे विद्युतीकरण

  • साधुग्रामसाठी वीजपुरवठ्याचे नियोजन

  • जुनी वीजयंत्रणा नूतनीकरण व आधुनिकीकरण

त्र्यंबकेश्वरमध्ये भूमिगत वाहिन्यांवर भर

त्र्यंबकेश्वर शहरातील वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ११ केव्ही उपरी वाहिनीचे काम ३२ टक्के, तर लघुदाब उपरी वाहिनी भूमिगत करण्याचे काम १५.५८ टक्के झाले आहे. याशिवाय ५७ एबी स्विच बसविण्यात आले असून, १७ वितरण पेट्या बदलण्यात आल्या आहेत. त्र्यंबकेश्वरमधील १५.८२ किलोमीटर वाहिनीच्या नूतनीकरणाचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. ३५ पोल बदलण्यात आले असून, १० व्हीसीबी बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे.

रोहित्रांची ३० एमव्हींपर्यंत क्षमतावाढ

तपोवन, गणेशवाडी, निलगिरीबाग आणि क्रीडासंकुल उपकेंद्रातील रोहित्रांची क्षमतावाढ करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. तपोवन आणि गणेशवाडी येथील २ x ५ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रांची २ x १० एमव्हीएपर्यंत वाढ पूर्ण झाली आहे. निलगिरीबाग येथील १ x ५ एमव्हीए रोहित्राची १ x १० असे एकूण ३० एमव्हीएपर्यंत क्षमतावाढ पूर्ण झाली आहे. क्रीडासंकुल उपकेंद्रातील संलग्न कामे पूर्ण झाली असून, रोहित्र उपलब्ध झाले आहे.

शाहीमार्ग, साधुग्रामसाठी नियोजन

त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ शाहीमार्गावर ११ रोहित्रांची उभारणी पूर्ण झाली आहे. नवीन १०० केव्हीए क्षमतेची सहा आणि २०० केव्हीए क्षमतेची तीन रोहित्र उभारण्यात आली आहेत. जुन्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली आहे. साधुग्रामसाठी आवश्यक उच्चदाब, लघुदाब वाहिन्या, रोहित्र आणि फिडर पिलर्सची कामे आखाड्यांच्या स्थापनेच्या वेळी सुरू करून अंतिम टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान

नाशिक शहरातील शाहीमार्गावरील भूमिगत वाहिन्यांची कामेही सुरू आहेत. ११ केव्ही भूमिगत वाहिनीचे काम १६ टक्के, तर अन्य वाहिनीचे काम ३७ टक्के पूर्ण झाले आहे. लघुदाब भूमिगत वाहिनीचे काम ४.८८ टक्के झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT