दिंडोरी : येथील महावितरणच्या कार्यालयाची झालेली दूरावस्था.  ( छाया : अशोक निकम)
नाशिक

Mahavitaran Office Building: महावितरण कार्यालयाची इमारत जीर्ण, कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात

तातडीने नवीन इमारत बांधण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी (नाशिक) : येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून येथे काम करणारे अधिकारी-कर्मचारी तसेच येणाऱ्या ग्राहकांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

पूर्वी महावितरणचे कार्यालय भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीत होते, तर सबस्टेशनमधील इमारतींमध्ये कर्मचाऱ्यांचे निवासस्थान होते. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या घटल्याने या इमारती मोकळ्या झाल्या. सुमारे पाच वर्षांपूर्वी कार्यालय शहरातून निळवंडी रोडवरील १३२ केव्ही वीज उपकेंद्राच्या आवारात हलविण्यात आले. ४५ वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत आता मोडकळीस आलेली आहे.

सध्या या इमारतीत उपकार्यकारी अभियंता कार्यालयासह दिंडोरी शहर व लखमापूर कक्षांची कार्यालये कार्यरत आहेत. येथे अधिकारी, कायमस्वरूपी व बाह्यस्त्रोत कर्मचारी मिळून सुमारे २५ जण कामकाज करतात. तसेच दररोज मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहकांची ये-जा सुरू असते. इमारतीची अवस्था धोकादायक असून अनेक ठिकाणी सिमेंटचे आवरण गळून पडलेले आहे, कॉलममधून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत, तर भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळते. उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यास निर्माण होणारे मोठे आवाज आणि हादरे या इमारतीस बसल्याने इमारत कोसळण्याचा धोका वाढला आहे. राज्यात ठिकठिकाणी पूल व इमारती कोसळून जीवितहानीच्या घटना घडत असताना, इतक्या जीर्ण अवस्थेतील इमारतीत महत्त्वाचे सरकारी कार्यालय चालवले जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बनले ऑफिस

इमारतीचे बांधकाम हे सन १९८१ मध्ये झालेले असून या इमारतीत पूर्वी तत्कालीन वीज बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सदानिका होत्या. मात्र ही इमारत अतिशय जीर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी वास्तव्य करण्यास कर्मचारी नापसंती दाखवू लागल्याने सदर इमारत बरेच वर्ष धूळखात पडलेली होती. परंतु महावितरण कंपनीचे दिंडोरी शहरातील भाडे तत्वावरील कार्यालय खाली केल्यानंतर उपविभागीय कार्यालय ह्या इमारतीत सन २०२०-२१ साली स्थलांतरित झाले. तेव्हापासून कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागते.

दोनदा पत्रव्यवहार करूनही दुर्लक्षच - इमारत अतिशय धोकादायक असल्याचे ९ मे २०२४ व १७ जून २०२५ रोजी नाशिक येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्या नावे पत्रव्यवहार करण्यात आला असूनही त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.
अमित झटकरे, कार्यकारी अभियंता, दिंडोरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT