

मनमाड (नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिपक गोगड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यास आयोजित विशेष सभेत एक सदस्य कमी असल्याने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.
एकूण 17 सदस्य आलेल्या बाजार समितीत अविश्वास ठरावासाठी 12 सदस्यांची गरज होती. मात्र, विरोधी गटातील एका सदस्याला मतदान करण्यापासून उच्च न्यायालयाने मनाई केली होती. त्यामुळे विरोधी गटाकडे 11 सदस्य होते. त्यामुळे पीठासीन अधिकारी बाबासाहेब बाबासाहेब गाढवे यांनी अविश्वास ठराव फेटाळला. यामुळे सभापती गोगडसह भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून सत्ता संघर्ष सुरू असल्याने बाजार समितीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. अडीच वर्षांपूर्वी 18 जागांसाठी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांमध्ये बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यात भुजबळ गटाला 12, तर कांदे गटाला चार जागा मिळाल्यानंतर संजय पवार यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. त्यांतर दीपक गोगड सभापती झाले. मात्र, राजकीय समीकरणे बदलून भुजबळ गटातील 7 सदस्य आमदार कांदे गटात सहभागी झाले. त्यामुळे सभापती गोगड अल्पमतात आल्यानंतर दोन्ही गटांत सत्तासंघर्ष सुरू होऊन प्रकरण जिल्हा उपनिबंधक, पणन मंडळ, सहकारमंत्री आणि उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. दरम्यानच्या काळात सभापती गोगड, गणेश धात्रक यांनी भुजबळांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पाच सदस्य भाजपमध्ये आल्याने दोन्ही गट महायुतीत असल्याने तडजोड होऊन सत्ता संघर्ष थांबेल असे वाटत असताना हा संघर्ष सुरूच असून विरोधी गटाने सभापती गोगड यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला.
अविश्वास ठराव दाखल करणारे विरोधी गटाचे गंगाधर बिडगर, संजय पवार, किशोर लहाने, कैलास भाबड, विठ्ठल आहेर, चंद्रकला पाटील, सुभाष उगले, आप्पा कूनगर, दशरथ लहिरे, संगीता कराड, मधुकर उगले सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानंतर सभापती दीपक गोगड आणि भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यलयाजवळ फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष संदीप नरवडे, गणेश धात्रक, लियाकत शेख, पंकज खताळ, प्रमोद पाचोरकर, सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.