महाराष्‍ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची केंद्रीय मंत्री प्रल्‍हाद जोशी यांची भेट घेतली (Image Source X)
नाशिक

Onion Purchase From Farmers |शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याची केंद्राकडे मागणी

महाराष्‍ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची केंद्रीय मंत्री प्रल्‍हाद जोशी यांच्या सोबत बैठक

पुढारी वृत्तसेवा

Buy onions directly from farmers; State demands from Centre

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा, अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देशातील एकूण कांदा उत्पादनात ५५% वाटा महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्याचा आहे. मात्र मे २०२५ मधील अनियमित पावसामुळे या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. २०२५- २६ मध्ये ५ लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डिबिटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नेमणूक करावी. यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर ४०- ४५ रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल. या प्रमुख मागण्याही करण्यात आल्या. या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल, असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळ आणि नेदरलँड्सच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे आशियातील प्रथम राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट आफ पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात आली आहे. हरितगृह तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देणारी ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकवून उत्पादनांचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजारपेठेतील स्थैर्य वाढवण्यास मदत करणार आहे.

या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मंत्री कोकाटे आणि मंत्री रावल यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब उभारण्यात आला असून, याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते व्हावे यासाठी पणन मंत्री रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्री चव्हाण यांना निमंत्रण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT