

Onion Farmer Subsidy
लासलगाव (नाशिक) : बाजारात कांद्याच्या घसरत्या किमतींचा मोठा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेतला असून, कांदा उत्पादकांना प्रती क्विंटल २०० रुपये, कमाल ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती असल्याने महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक भाग आहे. येथे उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मात्र, यंदा मार्च ते मे दरम्यान बाजारात कांद्याचे दर सतत घसरत गेले असून, जुलै महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचा सरासरी दर १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल एवढाच आहे. उत्पादन खर्चाही या दरातून निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे
गुजरात सरकारने परिस्थिती ओळखून तातडीने पाऊल उचलले, महाराष्ट्र सरकारने देखील यावर विचार करून समाधानकारक निर्णय घ्यावा
सचिन होळकर,कृषितज्ज्ञ,लासलगाव
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघत नाही, ही गंभीर स्थिती आहे. जर गुजरात सरकार मदत करू शकते, तर महाराष्ट्रातही तीच भूमिका घ्यायला हवी,"
भारत दिघोळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना
यातच मे महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कांद्याच्या साठवणुकीवरही या हवामान बदलाचा परिणाम झाला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ६०० कमाल २२०० सरासरी १५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे