Nashik Unseasonal Rain damaged crops  pudhari photo
नाशिक

Nashik Unseasonal Rain |मार्च महिन्यात अवकाळीने ६५ हजार शेतकरी बाधित

४१ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, ७३ कोटींचा मदत प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्रस्ताव मार्च महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७३ कोटी ३४ लाखांचा कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसताना एप्रिल महिन्यात पुन्हा जिल्ह्यावर अवकाळीचे संकट घोंघावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, नांदगाव, नाशिक, देवळा, मालेगाव, सटाणा, सिन्नर, चांदवड आणि निफाड या तालुक्यांना १८ मार्चला अवकाळी पावसाने झोडपले. अचानक आलेल्या या पावसामुळे बहुवार्षिक फळपिकांसह बागायती क्षेत्रावरील कांदा, मका, गहू, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागायतीच्या ३६ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे.

यात कांदा ३४ हजार १३६ हेक्टर, गहू १२३१ हेक्टर, भाजीपाला १८९ हेक्टर पिकांचा समावेश आहे. २५८ गावांमधील ५१ हजार ५४८ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने त्यांना हेक्टरी १७ हजार रुपयांप्रमाणे ६२ कोटी २९ लाख १० हजार रुपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. फळपिकांचे नुकसानग्रस्त गावे कमी प्रमाणात असली तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. जिल्ह्यातील १५२ गावांतील १४ हजार २०८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

यात द्राक्ष १९९ हेक्टर, डाळिंब ४५८४ हेक्टर, आंबा २७ हेक्टर, इतर ३१ हेक्टरवरील इतर फळपिकांचा समावेश आहे. बहुवार्षिक फळपिकांत ४९१४ हेक्टरवरील पिकांसाठी ११ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांची आर्थिक मदतीचा अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यांना अद्याप मदत मिळालेली नसताना शेतकरी चिंतातू आहेत. शेतकरी चिंतातुर झाला आहे.

अशी मिळते मदत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक फळपिके या क्षेत्रानुसार शासकीय मदत दिली जाते. कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना ८५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे, तर बागायती क्षेत्रासाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि फळपिकांना २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळते. यात नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर असायला हवे. २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार ही मदत प्रस्तावित करण्यात येते.

मार्च महिन्यातील नुकसान

बाधित गावे ४१०

बाधित शेतकरी - ६५,७५६

बाधित क्षेत्र (हे) ४१,५५६

अपेक्षित मदत ७३ कोटी ३४ लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT