

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप उपस्थित होते.
येत्या २०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थासाठी देशभरातून आठ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या साधू-महंत व भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेने १५ हजार १७३ कोटींचा आराखडा सादर केला होता; परंतु सिंहस्थ प्राधिकरणाने सरसकट आराखडा मंजूर न करता यातील काही कामांना प्रशासकीय मंजुरी दिली.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनेक विकासकामे अपेक्षित असताना त्यांचा समावेश प्रशासकीय मंजुरीत नाही. याचे पडसाद सोमवारी महासभेत उमटले, लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याची तक्रार करत सिंहस्थ प्राधिकरणावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. २१) मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
पायाभूत सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी, तसेच आगरटाकळी येथील रामदास स्वामी मठ देवस्थान विकसित करण्यात यावे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत मंजूर प्रकल्प निधी मिळावा, नाशिक महापालिकेस राज्य शासनाकडून येणे असलेले जमीन महसूल व बिनशेती कराची प्रलंबित रकम नगर नियोजन अंतर्गत ५० टक्के प्रीमियम चार्जेसमधून समायोजित करण्यात यावी, अशी मागणीही महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कुंभमेळ्याच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करता शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.