E-Buses File Photo
नाशिक

Toll Free E Bus | छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; एसटी ई-बसेसना द्रुतगती मार्गांवर टोलमुक्त प्रवास

Toll Free E Bus | राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी द्यावी, अशी सातत्याने होत असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Toll Free E Bus |

राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी द्यावी, अशी सातत्याने होत असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून आता राज्यातील सर्व इलेक्ट्रिक एसटी बसेसना द्रुतगती महामार्गांवर 100 टक्के टोलमाफी लागू करण्यात आली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली असून याचा सर्वात मोठा फायदा नाशिक-मुंबई मार्गावरील ई-शिवाई बस सेवेवर होणार आहे. या निर्णयानंतर ई-शिवाई बस समृद्धी महामार्गावरून धावू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि त्रासमुक्त होणार आहे. जुन्या महामार्गावरील कोंडी, टोल प्लाझांवरील विलंब आणि अनियमित वाहतुकीचा त्रास प्रवाशांना आता टळणार आहे.

निर्णयामागची पार्श्वभूमी

मंत्री छगन भुजबळ यांनी 3 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 ’ जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 या कालावधीत खासगी, सरकारी आणि निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

परंतु एसटीच्या ई-बसेससाठी स्वतंत्र परिपत्रक जारी झाले नसल्यामुळे टोलमाफी लागू होत नव्हती. त्यामुळे ई-बसेसना जुन्याच महामार्गांवरून प्रवास करावा लागत होता. यामुळे ना प्रवासाचा वेळ कमी होत होता ना प्रवाशांना आरामदायी सेवा देता येत होती.

भुजबळ यांच्या मागणीवर अखेर 22 ऑगस्ट 2025 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढले आणि आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.

प्रवाशांना होणारे प्रत्यक्ष फायदे

नाशिक–मुंबई दरम्यानच्या प्रवाशांवर या निर्णयाचा स्पष्ट आणि मोठा परिणाम दिसणार आहे.

  • जुन्या महामार्गावरून प्रवास करताना साधारण 4.5 तास लागत होते.

  • समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास प्रवासाचा वेळ तासभराने कमी होऊन फक्त 3.5 तास लागतील.

  • वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.

  • प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी बनेल.

  • एसटी महामंडळाची वार्षिक कोट्यवधी रुपयांची टोलची बचत होईल.

हा निर्णय केवळ प्रवाशांसाठी फायदेशीर नाही तर एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहार्यतेलाही मोठा आधार ठरणार आहे.

इतर मार्गांवरील बसेसना देखील फायदा

टोलमाफीची ही अंमलबजावणी आता पुढील मार्गांसाठीही मोठी गेम-चेंजर ठरणार आहे:

  • मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग

  • मुंबई–शिर्डी मार्ग

  • अटल सेतू (शिवडी–न्हावा शेवा)

  • मुंबई–छत्रपती संभाजीनगर

  • मुंबई–नागपूर

  • नाशिक–छत्रपती संभाजीनगर

  • नाशिक–नागपूर

या मार्गांवर भविष्यात ई-बसेस सुरू झाल्यानंतर त्यांनाही टोलमाफी लागू होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बसवाहतुकीला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT