

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण झाले. आता राजकीय पक्षांमधील प्रभाग वाटपाची प्रतीक्षा इच्छुकांना आहे. कोणता प्रभाग कोणत्या पक्षाच्या वाट्याला येईल, महायुती-आघाडी होईल की नाही, हे निश्चित नसल्यामुळे सर्वच प्रभागांत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली आहे.
प्रभाग आरक्षणामुळे कोणता प्रभाग आरक्षित झाला व कोणता प्रभाव खुला, हे सर्वच राजकीय पक्षांच्या माजी नगर-सेवकांसह इच्छुकांना समजले असले तरी, तो प्रभाग आपल्याच पक्षाला मिळेल, याची अजूनही खात्री नाही. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबाबत अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यामध्येही कुठे एकी दिसून येत नाही. महायुती व आघाडी निश्चित झाल्यानंतरच प्रभाग वाटपावर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वच राजकीय पक्षांकडून मुंबईतील २२७प्रभागांमध्ये जनसंपर्क कायम ठेवला आहे. एवढेच नाही तर, आपापल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागांमध्ये सक्रिय राहण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.
वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या सूच-नेनुसार प्रत्येक प्रभागात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी सक्रिय असल्याचे दिसत असला तरी, प्रभाग मिळण्याची खात्री नसल्यामुळे कार्यकर्ते विशेषतः इच्छुक फारसे सक्रिय नसल्याचे दिसून येते. साधारणतः आपल्या वाट्याला कोणते प्रभाग येऊ शकतात, याची खात्री असलेल्या प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेषतः शिवसेना ठाकरे गटाने परळ, भायखळा, लालबाग, काळाचौकी, शिवडी, वरळी, दादर, माहीम, अंधेरी, वांद्रे पूर्व, गोरेगाव, दिंडोशी, भांडुप, चेंबूर, अणुशक्ती नगर आदी विभागांतील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना थेट मातोश्रीतून देण्यात आल्या आहेत. महायुतीमध्येही शिवसेनेने ठाकरे गटाकडे असलेल्याच प्रभागांवर दावा केला आहे. पण यातील सर्व प्रभाग भाजपा सोडणार का, यावर शिंदे गटाच्या इच्छुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
भाजपा
दहिसर, बोरिवली, मालाड, अंधेरी पश्चिम, वेसावे, वांद्रे पश्चिम, मुलुंड, घाटकोपर पूर्व, भांडुप, नायगाव, सायन, माहीम, गिरगाव, मलबार हिल, कुलाबा
शिवसेना (शिंदे गट)
परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, दादर, वरळी, ताडदेव, गिरगाव, कुलाबा, चेंबूर, अणुशक्ती नगर, भांडुप, घाटकोपर पश्चिम, मागाठाणे, गोरेगाव, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, कुर्ला
शिवसेना (ठाकरे गट)
परळ, लालबाग, शिवडी, वडाळा, नायगाव, सायन, धारावी, दादर, वरळी, ताडदेव, गिरगाव, कुलाबा, चेंबूर, अणुशक्ती नगर, भांडुप, घाटकोपर पश्चिम, मागाठाणे, गोरेगाव, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी
काँग्रेस
मुंबादेवी, कुलावा, मलबार हिल, भेंडी बाजार, भायखळा, नागपाडा, अनुशक्ती नगर, धारावी, शिवाजीनगर, मानखुर्द, अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, खार, जोगेश्वरी पश्चिम, मालवणी, बोरिवली, मालाड पूर्व
मनसे
परळ, लालबाग, शिवडी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अंधेरी, दादर, शिवाजी पार्क, माहीम, वरळी
राष्ट्रवादी काँग्रेस
वांद्रे पूर्व, घाटकोपर पूर्व, मालाड, अनुशक्ती नगर, मानखुर्द