मुंबई, पुणे व नाशिकचा एक्यूआय १७५ च्या पुढे
नाशिकमध्ये सिंहस्थ कामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले
श्वसनविकार रुग्णांना वाढता त्रास
डॉक्टरांकडून मास्क वापरण्याचा सल्ला
राज्यातील अनेक शहरांत हवा आरोग्यास घातक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण असलेल्या मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांची हवा बिघडली आहे. या तिन्ही शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १७५ पार गेला असून, सद्यस्थितीत येथील हवा आरोग्यास घातक आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा परिणाम थेट वातावरणावर होत असून, शुद्ध हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची हवा प्रदूषित होत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक धोक्याच्या पातळीबाहेर नोंदविला जात आहे.
पाठोपाठ पुण्याचीदेखील हवा बिघडत आहे. नाशिक हे शहर आल्हाददायक हवेसाठी ओळखले जाते. मात्र, या शहराची हवादेखील बिघडली आहे. सध्या शहराच्या सर्वच भागात सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. त्यात रस्त्याच्या कामांची संख्या मोठी असल्याने, उडणाऱ्या धुळीचा परिणाम थेट वातावरणावर होत आहे.
त्यामुळे सध्या नाशिकच्या हवेचा एक्यूआय देखील घातक पातळीवर नोंदविला जात आहे. मंगळवारी (दि. ३) या तिन्ही प्रमुख शहरांचा एक्यूआय १७५ पार गेल्याची नोंद झाली. दरम्यान, हवा बिघडल्याने, श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना, विशेषतः अस्थमा (दमा), क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्राँकायटिस आणि अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास, खोकला, खरखर आणि छातीत कफ जमा होणे अशा समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कसह अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
मुंबई – १७८
पुणे – १७५
नाशिक – १७९
ठाणे – १८०
कोल्हापूर – १९८
छत्रपती संभाजीनगर – १७९
नागपूर – १८८
पिंपरी-चिंचवड – १७४
जळगाव – (नोंद उपलब्ध नाही)