El Nino | ‘अल निनो’ सक्रिय; दुष्काळाच्या संकटाची चाहूल 
नाशिक

Maharashtra El Nino Water Crisis | अल निनोचे संकट; पाण्याची आवर्तने तत्काळ बंद करण्याचे आदेश

Maharashtra El Nino Water Crisis | प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय हवामान विभागाने यावर्षी अल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची आणि पर्जन्यमानात मोठी घट होण्याची भीती वर्तवल्यामुळे राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाण्याचे भीषण संकट ओढवू नये यासाठी जलसंपदा विभागाने अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे.

राज्यातील सर्व धरणे, जलाशय आणि जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ आणि केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले असून, सध्या सुरू असलेली पाण्याची सर्व आवर्तने तत्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शासनाने या संदर्भात काढलेल्या परिपत्रकात सर्व जिल्हाधिकारी व संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील धरणं जलाशयांमधील व उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कारणांसाठी करु नये.

31 ऑगस्टपर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल यासाठी जपून धरणांमध्ये आरक्षित करण्यात आलेला पाणीसाठा वापरण्याबाबतही जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याबाबत तसेच धरणे, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्त्रोतांमधून होणारा अनाधिकृत व बेकायदेशीर पाणी उपसा तत्काळ थांबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही शासनाने काढलेल्या परिपत्रात देण्यात आले आहेत.

यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांमार्फत अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर सामुग्रींची तपासणी करण्याकरीता गस्त आयोजित करावी व वेळप्रसंगी 12 डिसेंबर 2018 रोजी काढण्यात आलेल्या कारवाईच्या कडक शासन निर्णयाप्रमाणे सुचनाही शासनाने परिपत्रकात दिल्या आहेत.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सिंचन आवर्तने स्थगित करण्याबाबतची कार्यवाही व बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रत्येक आठवड्याला सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त, सर्व पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी उद्या घेणार बैठक

अल निनो परिस्थितीचा प्रभाव यामुळे राज्यातील धरणातील पाणीसाठे आरक्षित करण्यासोबत पाण्याचे आर्वतन तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा आणि कृती आराखडा याबाबत मंगळवारी (दि. 16) पाटबंधारे आणि सिंचन विभागाकडून माहिती घेऊन नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीचे धरण, कालवा क्षेत्रातील मोटारी पंप काढून टाकण्याचे निर्देश दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT