नाशिक : पुढारी वृत्तसेवा
व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांची शीर्ष संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दैवार्षिक निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ४११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाच्या दोन दिवसांत १५६२ पैकी ७७८ इतके मतदान झाले आहे. शनिवारी (दि. १३) मतदानाचा अखेरचा दिवस असून, मतांचे दाण आपल्याच झोळीत पडावे, यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.
नुकतेच शतकमहोत्सव साजरा केलेल्या महाराष्ट्र चेंबरची द्वैवार्षिक निवडणूक आपापसातील मतभेदांमुळे चांगलीच गाजत आहे. निवडणुकीत एकता पॅनल संपूर्ण ताकदीनिशी मैदानात असून, प्रगती पॅनल मोजक्याच उमेदवारांसह नशीब आजमावत आहे. छाननी प्रक्रियेत प्रगती पॅनलच्या उमेद्वारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद झाल्याने, दोन्ही पॅनलमधील वाद विकोपाला गेला आहे.
प्रगती पॅनलने सत्ताधारी एकता पॅनलविरोधात उच्च न्यायालयासह जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. याशिवाय दोन्ही पॅनलचे प्रमुख आपसात भिडल्याचे व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत. अशात मतदार नेमका कौल कुणास देणार, याकडे व्यापार, उद्योग वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मतदानाच्या पहिल्या दिवशी ३६७ इतके मतदान झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यात वाढ होऊन ४११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केल्याने, मतदानाचा टक्का वाढल्याचे सांगितले जात आहे.
तर, शनिवारी उद्योग क्षेत्राला सुट्टी असल्याने, अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१२) दोन्ही पॅनलकडून मतदारांना आकर्षित प्रयत्न केल्याचे दिसून आले. आ. सीमा हिरे, म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
न्यायालयाकडून 'तारीख पे तारीख'
छाननी समितीने चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप करीत निवडणुकीला स्थगिती मिळावी, यासाठी प्रगती पॅनलकडून उच्च न्यायालयात सहा याचिका, जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत उच्च न्यायालयात २९ मे, ९ व ११ जून रोजी सुनावणी पार पडली. आता १५ जून रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर जिल्हा न्यायालयात ११ जून रोजी झालेल्या सुनावणीनंतर १६ जून ही तारिख देण्यात आली आहे. १५ जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.
दोन्ही उमेदवार नाशिकमध्ये
पहिल्या दिवशी पुणे, मुंबई, ठाणे, कुडाळ, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, धुळे, नवी मुंबई, नाशिक येथे मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी केवळ नाशिक आणि नवी मुंबई येथेच मतदान सुरू राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पॅनलचे वरिष्ठ उपाध्यक्षपदाचे उमेदवार नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. 'एकता'चे करुणाकर शेट्टी, 'प्रगती'च्या संगीता पाटील या मतदारांना साद घालताना दिसून आल्या.