

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर या संस्थेची द्वैवार्षिक निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. अर्ज छाननीत विरोधी पॅनलच्या प्रमुखांचेच अर्ज बाद झाल्यामुळे आता पॅनलप्रमुखांविनाच विरोधकांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विरोधी पॅनलकडून उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदासाठी कोण मैदानात असणार याकडे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे सत्ताधारी पॅनलकडूनदेखील उपाध्यक्षपदांसाठी पाच नावे असल्यामुळे त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब करताना सत्ताधाऱ्यांचा कस लागणार आहे. शुक्रवारी (दि. २९) माघार असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या २५ व २६ मे रोजी झालेल्या अर्ज छाननीत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाचे उमेदवार शेठ हिराचंद, वालचंद प्रगती पॅनलचे प्रमुख कांतिलाल चोपडा व उत्तर महाराष्ट्र विकास पॅनलचे प्रमुख संजय सोनवणे यांचे अर्ज बाद झाल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
कारकुनी आणि तांत्रिक त्रुटींमुळे या दोघांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत दोघांनीही तक्रार निवारण समितीकडे छाननी समितीच्या निर्णयावर नापसंती नोंदविली आहे. दरम्यान, शेठ हिराचंद, वालचंद प्रगती पॅनलकडून चोपडा यांच्याव्यतिरिक्त संजय राठी व रतन पडवळ यांनी देखील उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केलेला असल्याने व दोघांचे अर्ज वैध ठरलेले असल्याने दोघांपैकी एकास उपाध्यक्ष पदासाठी आता मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
अशात या दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते, याकडे आता लक्ष लागून आहे. दुसरीकडे सत्ताधारी एकता पॅनलकडून सचिन शाह, अंजू सिंघल, दीपाली चांडक, राजाराम सांगळे, सुनीता फाल्गुने यांचे उमेदवारी अर्ज उपाध्यक्ष पदासाठी वैध ठरल्याने, त्यांच्यापैकी एकाला मैदानात उतरविण्याचे मोठे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे. सूत्रांनुसार, सुनीता फाल्गुने आणि सचिन शाह या दोघांमध्ये उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीसाठी चुरस असणार आहे.
नाशिकच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी प्रगती आणि एकता पॅनल मैदानात उतरणार आहे. याशिवाय जळगाव उपाध्यक्षपद, जळगाव गव्हर्निंग काउन्सिलसाठीच्या ४ जागा, धुळे ३ व अहिल्यानगर एका जागेसाठी दोन्ही पॅनल आमनेसामने उतरण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि. २९) होणाऱ्या माघारीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न केले जात असून, विरोधी पॅनलच्या उमेदवारांना संपर्क साधून त्यांना विविध समित्यांचे आश्वासन दिले जात आहे. याशिवाय माजी अध्यक्षही मैदानात उतरल्यामुळे निवडणूक विनविरोध होण्याकडे लक्ष लागून आहे.
'विकास' आणि 'प्रगती' एकत्र लढणार?
संजय सोनवणे यांच्या विकास पॅनलने उपाध्यक्ष पदासह गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, यातील बरेच अर्ज बाद झाल्याने, आता विकास पॅनल प्रगतीसोबत एकताला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. याबाबत शुक्रवारी (दि. २९) दोन्ही पॅनलची एकत्र बैठक होणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी चुरस वरिष्ठ
उपाध्यक्ष पदासाठी एकता पॅनलकडून करुणाकर शेट्टी मैदानात आहेत. प्रगतीकडून जळगावच्या संगीता पाटील लढत देत आहेत. त्यांनी जळगाव उपाध्यक्ष पदासाठीही अर्ज दाखल केला आहे. त्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी लढणार की, जळगाव उपाध्यक्ष पदासाठी हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.
'तक्रार निर्वारण' आज देणार निर्णय
छाननीत अर्ज बाद झाल्यानंतर तब्बल ४० हुन अधिक उमेदवारांनी तक्रार निर्वारण समितीकडे धाव घेत, छाननी समितीच्या निर्णयावर आक्षेप घेणारे अर्ज सादर केले. त्यावर शुक्रवारी (दि. २९) निर्णय होणार आहे. माघारीच्या दिवशीच समितीचा निर्णय येणार असल्याने, उमेदवारांची दमछाक होणार आहे. दरम्यान, तक्रारी निवारणासाठी माजी अध्यक्षांची समिती नेमली असून, या समितीकडून निर्णय दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.