Maharashtra Chamber election complaint 
नाशिक

MCCI Election | महाराष्ट्र चेंबरमध्ये अखेर निवडणुकीचा धुरळा

MCCI Election | 'प्रगती' मोजक्या उमेदवारांसह, तर 'एकता' पूर्ण ताकदीनिशी मैदानात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

छाननीत मोठ्या प्रमाणात अर्ज बाद, विरोधक न्यायालयात या सर्व नाट्यमय घडामोडीनंतरही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी एकता आणि शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनल समोरासमोर उभे ठाकले असून, एकता पूर्ण ताकदीनिशी, तर प्रगती मोजक्याच उमेदवारांना सोबत घेऊन मैदानात उतरले आहेत.

वास्तविक, प्रगती पॅनलने उत्तर महाराष्ट्रातील दोन उपाध्यक्ष, नाशिक २७, धुळे तीन, जळगाव चार आणि अहिल्यानगर एक या गव्हर्निंग काउन्सिलच्या जागांसाठी तब्बल ७२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज छाननीत ६० पेक्षा अधिक अर्ज बाद झाल्याने, पॅनलची मोठी पंचाइत झाली आहे. दरम्यान, पॅनलने नाशिक उपाध्यक्षपदासाठी रतन पडवळ व संजय राठी हे दोन उमेदवार मैदानात उतरविल्याने, सभासदांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

तर, जळगाव उपाध्यक्षपदासाठी नितीन इंगळे हे पॅनलकडून मैदानात आहेत. याशिवाय नाशिकसाठीच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी आठच उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे एकता पॅनलने मात्र, पूर्ण ताकदीनिशी उमेदवार मैदानात उतरविले आहेत. नाशिक उपाध्यक्षपदासाठी सुनीता फाल्गुने, तर जळगावसाठी वेदांशू पाटील उमेदवारी करीत आहेत. याशिवाय नाशिकसह, जळगाव, धुळे, अहिल्यानगर येथील गव्हर्निंग काउन्सिलच्या सर्व जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

दरम्यान, छाननीत प्रगती पॅनलचे प्रमुख तथा उपाध्यक्षपदाचे उमेदवार कांतिलाल चोपडा यांचा अर्ज बाद झाल्याने ते निवडणुकीतून बाहेर आहेत. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र विकास पॅनलचे संजय सोनवणे यांचे चारही अर्ज बाद झाल्याने त्यांनाही दूर राहावे लागत आहे. याशिवाय सोनवणे यांच्या पॅनलकडून भरण्यात आलेल्या १८ उमेदवारांपैकी काहीचे अर्ज बाद तर काहींनी माघार घेतल्याने संपूर्ण पॅनलच निवडणुकीच्या बाहेर पडले आहे.

राठी यांची माघार अमान्य

उपाध्यक्षपदासाठी प्रगती पॅनलकडून वैध अर्ज ठरलेल्या रतन पडवळ व संजय राठी या दोघांपैकी एकाने अर्ज मागे न घेतल्याने, दोघेही उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. राठी यांनी २७ मे रोजीच माघारीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. मात्र, तो माघारीच्या विहित नमुन्यात नसल्याने तो अमान्य केला गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश घोरपडे यांनी सांगितले आहे.

वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी चुरस

वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी एकता पॅनलकडून करुणाकर शेट्टी, तर प्रगती पॅनलकडून संगीता पाटील यांच्यात चुरस बघावयास मिळणार आहे. संगीता पाटील यांनी जळगाव उपाध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज केला होता. परंतु, त्यांनी हा अर्ज मागे घेत, वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी करणे पसंत केले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात सहा याचिका दाखल केल्या होत्या. याचिका ग्राह्य धरत न्यायालयाने आमची बाजू जाणून घेतली. तसेच संपूर्ण निवडणूक आणि निकाल न्यायालयाच्या अधिपत्याखाली राहील असे स्पष्ट आदेश केले आहेत. आता ९ जून रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहोत.
कांतिलाल चोपडा, प्रमुख, प्रगती पॅनल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT