Nashikdistributes free fodder seeds worth 3 crore 
नाशिक

Nashik distributes free fodder seeds worth 3 crore- शेतकऱ्यांना मोफत ३ कोटींचे चारा बियाणे

दीपावलीच्या मुहूर्तावर पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम; प्रत्येकी ४ हजारांचे बियाणेवाटप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी उन्हाळ्यातील संभाव्य तीव्र चाराटंचाईच्या झळांपासून पशुधनाला वाचविण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने आणि पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल तीन कोटी रुपये मूल्याचे १ लाख १७ हजार किलो दर्जेदार चारा बियाणे पूर्णपणे मोफत वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. किमान तीन ते चार वेळा पाणी देण्याची सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपये किमतीचे हे बियाणे थेट उपलब्ध करून दिले जात आहे.

जिल्ह्यात लहान मोठी मिळून एकूण १८ लाखांहून अधिक पशुधन आहे. या जनावरांना दरमहा सरासरी १ लाख ९४ हजार टन ओला आणि सुका चारा लागतो. चालू वर्षी खरिपात उपलब्ध झालेला चारा हा केवळ जानेवारी २०२७ अखेरपर्यंतच पुरेल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात चाराटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने वेळीच पावले उचलली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मोफत चारा बियाण्यांचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ज्वारी क्षेत्रात तिप्पट वाढीचे उद्दिष्ट

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र १.११ लाख हेक्टर इतके आहे. यापैकी दरवर्षी सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. मात्र, यंदा उद्भवणाऱ्या चारा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने रब्बी ज्वारीचे क्षेत्र थेट ३० हजार हेक्टरपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे.

या तालुक्यांना प्राधान्य

सध्या पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेल्या तालुक्यांवर भर देण्यात आला असून, निफाड, दिंडोरी, कळवण, मालेगाव, देवळा आणि सिन्नर या तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना हे बियाणे वाटले जात आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पशुधनासाठी साधारणतः महिनाभर पुरेल इतका दर्जेदार ओला चारा वेळेत उपलब्ध होणार आहे.

जानेवारीनंतरही जिल्ह्यात कुठे चारा बियाण्यांची अधिक आवश्यकता भासल्यास, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) माध्यमातून निधी व बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. जिल्ह्यात एकाही जनावराला चाऱ्याची टंचाई भासू नये, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

- डॉ. संजय शिंदे (सहायक पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT