शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद  Pudhari File Photo
नाशिक

Maharashtra ration card grain : राज्यात ५७ हजारांहून अधिक शिधापत्रिकांवरील धान्य बंद!

'मिशन सुधार'मुळे रेशन व्यवस्थेला पारदर्शकतेची जोड : डेटाबेस अद्ययावत करण्यावर प्रशासनाचा भर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नामदेव भोर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभअधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या 'मिशन सुधार'ला वेग आला आहे. या मोहिमेत मृत, दुबार, स्थलांतरित तसेच विविध निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या सुमारे ५७ हजार ७६३ शिधापत्रिकांवरील अन्नधान्याचा लाभ बंद करण्यात आला असून, अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची पडताळणी होत आहे. राज्यातील कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नोंदी अद्ययावत होण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध अन्नधान्याचा योग्य विनियोग होण्यास मदत होत आहे.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या जुलै २०२६ पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ५७ हजार ७६३ शिधापत्रिकांवरील अन्नधान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. या कारवाईचा परिणाम सुमारे २ लाख ८५ हजार लाभार्थ्यांवर झाला आहे. मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकेत कायम राहणे, एकाच व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या दुबार नोंदी असणे, स्थलांतरानंतर जुन्या ठिकाणी नोंद कायम असणे तसेच पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या नोंदी यांची छाननी या मोहिमेत केली जात आहे.

मोहिमेचा प्रमुख उद्देश केवळ लाभार्थी कमी करणे हा नसून, शासकीय धान्याचा लाभ प्रत्यक्ष पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिधापत्रिकांचा डेटाबेस अधिक अचूक करणे हा आहे. त्यामुळे मृत अथवा दुबार नोंदी कमी झाल्यानंतर उपलब्ध धान्यसाठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्याचबरोबर पात्र कुटुंबांच्या हक्काच्या धान्यावर परिणाम होऊ नये, यासाठी पात्रता पडताळणी आणि नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे.

राज्यातील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्येही स्वतंत्रपणे पडताळणी आणि कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी संशयित शिधापत्रिकांची तपासणी सुरू असून, तपासणीनंतर पात्रता निश्चित केली जात आहे. त्यामुळे संशयित शिधापत्रिका आणि प्रत्यक्ष अपात्र ठरविलेल्या शिधापत्रिका यांची संख्या वेगळी आहे.

नाशिक जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिकांची छाननी सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख ४ हजार ६९० शिधापत्रिका तपासणीच्या कक्षेत असून, आतापर्यंत ५४ हजार ३६७ मृत लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्यात आली आहेत. मृत सदस्यांच्या नोंदी हटवल्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकांचा तपशील अद्ययावत होऊन पात्र लाभार्थ्यांना अधिक अचूकपणे लाभ देण्यास मदत होणार आहे.

नाशिकमध्ये ५४ हजार मृतांची नावे वगळली

५,०४,६९० - तपासणीच्या कक्षेतील शिधापत्रिका

५४,३६७ - शिधापत्रिकेतून वगळलेली मृत लाभार्थ्यांची नावे

दुबार व संशयास्पद नोंदींचीही पडताळणी सुरू

राज्यात 'मिशन सुधार'चा परिणाम

१ कोटी ६९ लाख ११२२२- एप्रिलमधील शिधापत्रिका

१ कोटी ६८ लाख ५३५२९ ऑगस्टमधील शिधापत्रिका

५७,७६३ - अन्नधान्याचा लाभ बंद झालेल्या शिधापत्रिका

सुमारे २.८५ लाख - प्रभावित लाभार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT