

नाशिक : म्हसरूळ येथील दिंडोरी जकात नाका परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईवरून गुरुवारी (दि. २०) मोठा राडा झाल्याचे समोर आले. एका बाजूला मनपाच्या पथकाने खासगी जागेवर उभारलेल्या सात ते आठ टपऱ्या हटविण्याची कारवाई केली. मात्र त्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर ७० ते ८० व्यक्तींना घेऊन प्रवेश करून मारहाण, धमकी, जातिवाचक शिवीगाळ आणि बेकायदेशीर कब्जा केल्याचा गंभीर आरोप गायत्री राहुल धोंगडे यांनी केला आहे. याप्रकरणी प्रवीण शाह, तेजस शाह, सुरेखाबेन शाह, मनपा अधिकारी, यांच्यासह ७० ते ८० अज्ञात व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर म्हसरूळ पोलिस ठाण्यात धोंगडे परिवाराकडून निवेदन देण्यात आले. ही जमीन अनुसूचित जमातीतील कुटुंबाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. जमिनीच्या मालकी व कथित बेकायदेशीर हस्तांतरणाबाबत अपर तहसीलदार नाशिक यांच्या न्यायालयात आदिवासी केस प्रलंबित असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सातबारा उताऱ्यावर प्रवीण शाह आणि इतरांची नावे दाखल असल्याने त्यास कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. प्रवीण शाह व तेजस शाह यांनी मारहाण करून गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप आहे. कुटुंबातील काही सदस्यांना पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कंटेनरसदृश रेडिमेड कार्यालय जागेवर उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याच परिसरात खासगी जागेवर अनधिकृतपणे उभारलेल्या सात ते आठ टपऱ्या हटविण्यास मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सुरुवात केली. कारवाईला एका व्यावसायिकाने तीव्र विरोध केला. मनपा कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर त्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपा कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दोन्ही घटनांमुळे म्हसरूळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरील कथित कब्जा, मारहाण आणि धमकीच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी गायत्री धोंगडे यांनी केली आहे. दरम्यान, मनपाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण केली असून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर बाजू तपासली जाण्याची शक्यता आहे.