नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. या प्रक्रियेत राज्यभरात ३३ लाख ९४ हजार ५३ मतदार मृत असल्याची नोंद झाली आहे. १६ लाख ६२ हजार १२१ मतदार अन्यत्र नोंदणी केलेले वा दुबार नोंदणीच्या श्रेणीत आढळले आहेत.
राज्यात मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन गणनापत्रके भरून घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत राज्यातील ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० मतदारांची गणनापत्रके भरून प्राप्त झाली आहेत. मात्र, १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ मतदार गणनापत्रक जमा न होणाऱ्या श्रेणीत नोंदवले आहेत. या मतदारांत घर बंद असणे, मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित होणे, मृत्यू झालेला असणे, अन्यत्र नोंदणी होणे वा दुबार नोंदणीसह इतर कारणांचा समावेश आहे.
या श्रेणीतील सर्वाधिक ७१ लाख ९५ हजार ३८८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळले. त्यापाठोपाठ ६३ लाख ६१ हजार ११३ मतदार अनुपस्थित आहेत. ३३ लाख २४ हजार ५३ मतदार मृत असल्याची नोंद झाली आहे. १६ लाख ६२ हजार १२१ मतदार अन्यत्र नोंदणी केलेले वा दुबार नोंदणीच्या श्रेणीत आढळले आहेत. याशिवाय १ लाख ४३ हजार ५५६ मतदार इतर कारणांत समाविष्ट आहेत.
जिल्ह्यातील ९६.५९ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४९ लाख ३० हजार ४१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. १ लाख ७४ हजार ४१ मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७५ हजार ९९९ मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे. त्याचे प्रमाण १५.४१ टक्के आहे. नाशिक मध्य मतदारसंघात २२ हजार १२, मालेगाव बाह्यमध्ये २१ हजार ३६४ आणि मालेगाव मध्यमध्ये १६ हजार ६७६ मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे. देवळालीत १४ हजार २६, चांदवडमध्ये १० हजार ५३३, सिन्नरमध्ये ८ हजार ४७० आणि कळवणमध्ये ३ हजार ८४९ मतदारांचे मॅपिंग प्रलंबित आहे.
नोंदींची स्वतंत्र पडताळणी
मृत तसेच अन्यत्र नोंदणी झालेल्या किंवा दुबार नोंदी असलेल्या मतदारांची माहिती विशेष लक्ष देऊन तपासली जात आहे. संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीच्या आधारे राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींकडून संबंधित मतदारांची पडताळणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात ९७.१४ टक्के काम पूर्ण
राज्यातील ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ मतदारांबाबत (९७,१४ टक्के) कार्यवाही झाली आहे. उर्वरित २७ लाख ९८ हजार ४५८ मतदारांबाबत कार्यवाही बाकी आहे.