नाशिक : नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. महापौरपदासाठी गुरुवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.
नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (दि.17) हाती आले. लोकसभा, विधानसभा निवडणुकांपाठोपाठ महापालिकांच्या निवडणुकांमध्येही पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. नाशिक महापालिकेतील 122 पैकी सर्वाधिक 72 जागांवर विजय मिळवित भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता काबीज करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
बहुमत भाजपकडे असल्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे. मात्र महापौरपदाची आरक्षण सोडत काढलेली नसल्यामुळे महापौरपद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. परंतु नगरविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी करत आरक्षण सोडतीची प्रतीक्षा संपविली आहे. नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत 22 जानेवारी रोजी मुंबईत पार पडणार आहे.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहामध्ये नगरविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. यामुळे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.