

निफाड : वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्या या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नाशिक, येवला आणि पिंपळगाव या तिन्ही मुख्य मार्गांकडे जाणारी वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलकांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वनहक्क कायदा होऊन 20 वर्षे उलटली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ताब्यात असलेल्या 4 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राची मोजणी करून नकाशासह स्वतंत्र 7/ 12 उतारा देण्यात यावा. अपात्र ठरवलेले वनदावे स्थानिक पुराव्यांच्या आधारे पुन्हा पात्र करावेत. पट्टाधारकांच्या शेतीमालाला, विशेषतः भात, मका, सोयाबीन, कांदा आणि स्ट्रॉबेरीला हमीभाव व बोनस मिळावा. पेसा क्षेत्रातील रिक्त नोकर भरती तत्काळ सुरू करावी.
गुरे चारण, गायरान व देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निरभवणे, किसान सभेचे तालुका अध्यक्ष वाळूबा ससाणे, डॉ. पारधे, भाऊसाहेब सूर्यवंशी, म्हसू गुंजाळ, डावल मोरे, ताई वाघ, वैशाली सूर्यवंशी, भास्कर बर्डे, रंजना पवार, अरुण कोकाटे, श्रीपद मोरे, जयसिंग पवार, रंगनाथ कडाळे, हौशाबाई माळी, कारभारी गांगुर्डे, संध्या माळी आदी उपस्थित होते.