

सिडको : निवडणुका संपताच गुंडगिरीने डोके वर काढल्याचे चित्र कामटवाडे परिसरात पाहायला मिळाले. रविवारी रात्री सुरू असलेली हाणामारी थांबवण्यासाठी गेलेल्या एका पती-पत्नीला नगरसेवकाच्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली. महिलेच्या पोटात लाथा मारण्यात आल्या असून, ती गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांकडून तत्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप करत महिलेच्या सासूने पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने सिडको हादरला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार (दि. 18) रात्री कामटवाडे गावात काही टवाळखोरांमध्ये हाणामारी सुरू होती. रस्त्याने जात असलेले आशुतोष कटारे आणि त्यांच्या पत्नीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक मुकेश शहाणे यांचे कार्यकर्ते अमोल पाटील, विनोद मगर आणि अन्य तिघा चौघा कार्यकर्त्यांनी दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली.
महिलेच्या पोटात लाथा मारल्याने ती जबर जखमी झाली. पोलिसांकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आशुतोष यांच्या आई संगीता कटारे यांनी त्रिमूर्ती चौकात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अमोल पाटील यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अंबडचे पोलिस निरिक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.
निवडणुकीत अपयश आल्याने मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय. राजकीय षडयंत्र रचले जात आहे. या प्रकरणात काहीही संबंध नाही. पोलिस योग्य ती कारवाई करून दोषींना कठोर शासन करतील.
मुकेश शहाणे, नगरसेवक
रात्री माझा मुलगा, सून यांना विनाकारण मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे कुंड आम्ही मुकेश शहाणेचे माणसे आहेत. मला न्याय न मिळाल्यास मी पुन्हा आत्मदहन करणार असून याला पोलीस आणि शहाणे जबाबदार राहतील.
संगीता कटारे, तक्रारदार महिला