सटाणा, नाशिक : सटाणा येथील आरम नदीकाठी वसलेल्या प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरातील ऐतिहासिक मूर्तीचे शास्त्रशुद्ध जतन व संवर्धन नुकतेच यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. तैलांगी अखंड पाषाणातून घडवलेली ही दुर्मीळ आणि अत्यंत देखणी मूर्ती तिच्या सौंदर्य, स्थापत्यकलेच्या वैशिष्ट्यांमुळे तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. संवर्धनानंतर मूर्तीचे मूळ तेजस्वी स्वरूप अधिक खुलून आले असून भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मूर्तीवर पाणी, आर्द्रता आणि प्रदूषणाचा परिणाम होऊन ती झिजत होती. तडे, भेगा आणि जैविक वाढ दिसत होती. यामुळे वेळीच संवर्धनाचे काम हाती घेतले गेले. मूळ रचना कायम ठेवत नैसर्गिक द्रव्यांनी मूर्तीला मूळ रुप देण्यात आले. या कामात हर्षद मोरे, ओमकार मोरे, शांताराम मोरे यांनी योगदान दिले. त्यांना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश येवला, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, योगेश चंद्रात्रे, पुरोहित व भाविकांनी सहकार्य केले.
ही मूर्ती १५९० मध्ये मुल्हेर गडावरील बागूल राजे नारायण शहा राठोड यांनी झंझ राजांकडून आणली व प्रतिष्ठापित केली. मुगल आक्रमणाच्या काळात भाविकांनी ही मूर्ती सुरक्षितपणे मोती टाक्यात लपवली. इ.स. १८७५ मध्ये श्री यशवंतराव देवमामलेदार महाराजांनी मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा केली. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराप्रमाणे या मूर्तीवर कार्तिक महिन्यात सूर्यकिरणे विशिष्ट कोनात पडतात. त्यावेळी येथे किरणोत्सव साजरा केला जातो.
मूर्ती संवर्धनासाठी कोरडी ब्रशिंग, वाफेने स्वच्छता, जैविक उपचार व हायड्रोफोबिक तंत्राचा वापर करण्यात आला. या प्रक्रियांमुळे मूळ मूर्तीच्या आतील थरांपर्यंत संरक्षण मिळाले असून तिचे आयुष्य अनेक दशकांनी वाढण्यास मदत होईल. हे सर्व उपचार भविष्यात बदलता येतील, अशा सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले आहेत.
मूर्तीवर आर्द्रता, उष्णता, वारा आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम होत होता. त्यामुळे संवर्धकांनी मूर्तीच्या गाभ्यापर्यंत नैसर्गिक घटक पोहोचवत तिला आतून बळकटी दिली. कोणतेही एम-सील, एरल्डाईट, कृत्रिम आणि हानिकारक केमिकल्स यांचा वापर नाही, हे विशेष!
‘मिट्टी फाउंडेशन’ संस्था जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशाचे शास्त्रशुद्ध जतन-संवर्धन करत आहे. भविष्यातही अशा पुरातन ठिकाणांचे जतन हे सामाजिक व सांस्कृतिक कर्तव्य समजून करणार आहोत.मयूर मोरे, जतन व संवर्धन तज्ज्ञ.
समपाद स्थितीत उभी असलेली महालक्ष्मी मूर्ती
डोक्यावर धम्मिला मुकुट धारण केलेला. त्यावर सर्वात वर सूर्य, चंद्र प्रतिमा, खालील थरात शिवलिंग
मुकुट अनंतनाग वेष्टीत. कपाळावर लतावल्लिका, कानात सूर्यवृत्त प्रकारातील मकर कुंडले
स्मितहास्य असलेलं लोभस मुखमंडल
उजव्या बाजूच्या खालील हातात व्याख्यान मुद्रेत महाळुंग फळ पकडलेले
वरील हातातील तर्जनी मुद्रेत कौमोदीकी गदा धारण.
डावीकडील वरील हातात कटक मुद्रेत ढाल धारण.
डावीकडील खालच्या हातात सूचीमुद्रेत अमृतपात्र-पानपात्र.