पणजी : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी संस्थानाचे मंदिर येत्या श्रावण महिन्यापासून खुले होणार आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे २१ जुलैपासून मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याचे संस्थानाच्या व्यवस्थापन समितीने मंगळवार (ता.३०) जाहीर केले आहे.
राज्यात जनता कर्फ्यु २२ मार्चपासून लागू करण्यात आला होता. त्याआधीपासून पणजीतील श्री महालक्ष्मी संस्थानाचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. हे मंदिर पुन्हा खुले करण्यासाठी देवीकडून कौल-प्रसाद मिळाल्यानंतर येत्या श्रावण महिन्यापासून मंदिर खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व 'मानक प्रक्रिया प्रणाली'चे (एसओपी) पालन केले जाणार असून सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन व्यवस्थापन समितीने पत्रकाद्वारे केले आहे.