नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात १९ ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सातपूर विभागातील हॉटेल डेमॉक्रसी येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, दि. २८ व २९ ऑगस्टला मुख्यमंत्री पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार असून, सिंहस्थ कामांची पाहणी व आढावा बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. कुंभमेळ्याच्या कामांच्या गतीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात १९ ऑगस्ट रोजी सातपूर विभागातील डेमॉक्रसी येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २८ व २९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा नाशिकमध्ये येणार असून, सिंहस्थाच्या तयारीतील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, कामांची मंथ गती आणि बांधकामांच्या गुणवत्तेवरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः कामांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्यास संबंधित यंत्रणांवर दबाव वाढणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असल्याने मुख्यमंत्री नाशिकच्या कामांवर अधिक थेट लक्ष ठेवणार असल्याची माहिती आहे.
त्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. भविष्यातील बैठका आणि सिंहस्थ कामांचा आढावा याच कार्यालयातून घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षा, वाहतूक, कार्यक्रमस्थळे तसेच विविध विकासकामांच्या पाहणीचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होणे बाकी असले, तरी प्रशासकीय पातळीवर दौऱ्याच्या तयारीला वेग आला आहे.