

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यापूर्वी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) प्रलंबित घरगुती गॅसजोडण्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. अन्यथा आज दुरुस्त केलेले रस्ते उद्या पुन्हा खोदण्याची वेळ येईल आणि त्याचा फटका नाशिककरांना बसणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात प्रलंबित घरगुती जोडण्याचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन नाशिक महापालिकेने एमएनजीएलला दिली आहे.
शहरात एमएनजीएलकडून सुमारे दोन लाख घरगुती गॅसजोडण्या देणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ सुमारे ४५ हजार जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे तब्बल दीड लाखाहून अधिक जोडण्या अद्याप प्रलंबित असून, त्यासाठी भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने एमएनजीएलला प्रलंबित कामांना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रलंबित घरगुती जोडण्यांसाठी अंदाज ५० किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम अद्याप बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यापूर्वी रस्त्यांची अंतिम पुनर्बांधणी केल्यास घराघरांत जोडणी देण्यासाठी नव्याने खोदकाम करावे लागेल. त्यामुळे रस्त्यांवर पुन्हा खर्च करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधी पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
एमएनजीएलकडून घरगुती जोडण्यांसाठीचे सर्व खोदकाम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी कंपनीने जमा केलेल्या ३९२ कोटी रुपयांच्या निधीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे 'आधी गॅस जोडणी की आधी रस्ता?' या प्रश्नावर महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रलंबित कामांचा नेमका आढावा घेण्यासाठी महापालिकेने एमएनजीएलसोबत बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रभागनिहाय, कालबद्ध आणि जीआयएस आधारित कृती आराखडा सादर करण्याची मागणी केली जाणार आहे. कोणत्या भागात किती जोडण्या प्रलंबित आहेत, किती पाइपलाइन टाकायची आहे आणि काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, याचे स्पष्ट मॅपिंग या आराखड्यात अपेक्षित आहे.
प्रलंबित कामे दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी एमएनजीएलने मनुष्यबळात मोठी वाढ करावी, अतिरिक्त पथके तैनात करावीत आणि शहरातील विविध भागांत एकाच वेळी कामे सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेने केली आहे.
कामाला गती मिळावी यासाठी महापालिकेच्या मालमत्ताकर विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्यही उपलब्ध करून देणार आहे. हे कर्मचारी एमएनजीएलच्या पथकांसोबत जाऊन नागरिकांकडून गॅसजोडणीसाठी आवश्यक अर्ज जमा करण्यास मदत करणार आहेत.