नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे, ओला दुष्काळ पडला आहे, पिके भुईसपाट झाली आहे, आम्ही कसे जगायचे असा संतप्त सवाल उपस्थितीत करत शासनाने आम्हाला आता कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सभासद शेतकऱ्यांनी लावून धरली. त्यावर डॉ. सुनील ढिकले, राजू देसले यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, बॅंकेला आर्थिक पॅकेज द्यावे या ठरावास सभागृहाने मंजुरी दिली. हा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार असून पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही जिल्हा बॅंकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.29) प्रशासक बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली कलिदास कलामंदिर येथे झाली. यावेळी ज्येष्ठ सभासद नारायण वाजे, राज्य सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश कोलवाडकर, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, व्यवस्थापक दीपक पाटील, धनजंय चव्हाण उपस्थितीत होते.
सुरुवातीस वैयक्तिक सभासद निवडीची प्रक्रिया होऊन, सभासदांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर, सभेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्ष निवडीवर काही सभासदांनी आक्षेप नोंदविला. सभासदांतून अध्यक्ष घ्यावा, अशी आग्रही मागणी सभासदांनी केली. त्यावर, बिडवई यांनी ज्येष्ठ सभासद नारायण वाजे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी प्रस्ताविक करत, विषयांचे वाचन केले.
यावेळी सभासदांनी पावसाने सारं वाहून गेले, पैसे कसे भरणार अशी आर्तहाक दिली. थकबाकीने संकटात असलेला बळीराजा अतिवृष्टीने बेजार झाला आहे, त्यामुळे त्याचा अंत पाहू नका शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी राजू देसले यांनी यावेळी केली. याच अनुषगांने व्यासपीठावर गेलेले सुनील ढिकले यांनीही शासनाने दोनदा कर्जमाफी देऊनही शेतकरी कर्जबाजारी राहिला आहे. यातच जिल्ह्यात ओला दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, असा ठराव यावेळी मांडला. त्यास सभागृहातील सभासदांनी हातवर करत अनुमोदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत भाऊसाहेब ढिकले, शिवाजी ढेपले, राजेंद्र पवार, कैलास बोरसे, विलास बोरस्ते, उत्तम जाधव, गिरीश मोहिते, शिरीष कोतवाल, राजाभाऊ खेमणार, खंडू बोडके, शिवा सुरासे आदींनी सहभाग घेतला.
इतिवृत्त मंजूरीवरून गोंधळ
विषयाचे वाचन सुरू असताना विशेष सभेत नवीन समोपाचार योजनेला दिलेल्या मंजुरीचा मुद्दा कैलास बोरसे यांनी उपस्थितीत केला. या विषयाला सभेने मंजुरी दिली नसल्याचे त्यांनी सांगत हा विषय नामंजूर करावा, अशी मागणी केली. त्यास प्रकाश शिंदे, भगवान बोराडे यांनीही दुजोरा दिला. या विषयाला नामंजूरी दिलेली असताना योजना लागू केली हा सभासदांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रकाश शिंदे यांनी केला. परंतु, सदर विषय मंजूर करून त्यास शासनानेहही मंजूरी दिली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर सभासदांनी एकच गोंधळ केला. यानंतर, शिंदे यांनी पुन्हा इतिवृत्त नामंजुर करावे असा ठराव मांडला त्यास शिवराम कदम यांनी अनुमोदन दिले. याची नोंद घेतली जाईल, असे प्रशासक बिडवई यांनी सांगितले.
विषय मांडण्यावरून सभासदांमध्ये चढाओढ
सभेत विषय मांडण्यासाठी सभासदांमध्ये चढाओढ सुरू होती. यावेळी मुद्दे मांडण्याकरिता सभासदांनी व्यासपीठासमोर एकच गर्दी केली होती. त्यावेळी काहीसा गोंधळ झाला. काही सभासदांनी व्यासपीठावर जात, विषय मांडण्याचा प्रयत्नही केला. यावेळी अनिल ढिकले यांनी माईकचा ताबा घेत, सभासदांना शांत करत, एका-एकाने विषय मांडावे असे सांगितले. त्यानंतर एक-एक सभासद विषय मांडू लागले. परंतू, सातत्याने एकच विषय मांडला जात असल्याने सभासदांकडून त्यास विरोध होऊ लागल्याने आरडा-ओरड झाली यातही, सभासद माईक घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत राहिले.
जिल्हा बॅंकेने लागू केलेल्या नवीन समोपचार योजनेतून 22.23 कोटींची वसुली झालेली आहे. सभासदांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अतिवृष्टीने शेतकरी संकटात आला आहे. त्यासाठी या योजनेला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. ठेवीदांराच्याही ठेवी अडकल्या असल्याने त्यांचाही विचार आता करावा लागलार आहे. बॅंकेला भागभांडवलीचा 672 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे दाखल असून अर्थ खात्याने त्यावरील काढलेल्या त्रुटी दूर केल्या आहे.संतोष बिडवई, प्रशासक, जिल्हा बॅंक
नागपूर जिल्हा बॅंकेच्या धर्तीवर ठेवी देण्याची मागणी
भालचंद्र पाटील, जगदीश गोडसे यांनी ठेवीदारांच्या ठेवी अडकल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. ठेवी अडकल्या असून या ठेवींचे व्याज मिळत नसल्याने बॅंका, पतसंस्था, सहकारी संस्था अडचणीत सापडल्या असल्याचे निर्देशनास आणून दिले. वारंवार व्याज दिले जाणार असल्याचे सांगूनही व्याज दिले जात नसल्याचे पाटील यांनी सांगत, संतापत व्यक्त केला. नागपूर जिल्हा बॅंकेच्या धर्तीवर ठेवी देण्याची मागणी गोडसे यांनी यावेळी केली. त्यावर, डिसेंबर अखेरपर्यंतचे व्याज देण्याचा बॅंकेचे नियोजन असल्याचे प्रशासक बिडवई यांनी सांगितले.