Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Nashik | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामघाट, पंचवटी व कुशावर्त परिसरात मद्यविक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव

Kumbh Mela Nashik | जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाकडून मागवला अहवाल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर रामघाट, पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तलाव परिसरातील मद्यविक्री दुकानांवर निर्बंध लादण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कुंभमेळ्याचे धार्मिक पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी, तसेच सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या परिसरातील मद्यविक्रीवर मर्यादा घालण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाने नाशिक महापालिकेकडे तातडीने अहवाल मागवला आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये रामघाट, पंचवटी तसेच कुशावर्त तलाव परिसरातील २ ते ३ किलोमीटरच्या क्षेत्रात मद्यविक्रीवर निर्बंध आणण्याबाबत चर्चा झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, 'महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९' च्या कलम १३९ मधील तरतुदींनुसार आदेश निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय व अधिसूचना काढण्यापूर्वी गृह विभाग व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टता मागवली आहे. यात क्षेत्रीय अंतर व कालावधीवर भर देण्यात आला आहे.

रामघाट, पंचवटी व कुशावर्त परिसरातील नेमक्या किती अंतराच्या (किलोमीटर) परिसरातील मद्यविक्री परवाने (अनुज्ञप्त्या) बंद ठेवायचे आहेत? नमूद क्षेत्रातील मद्यविक्री दुकाने नेमकी किती कालावधीसाठी बंद अथवा निर्बंधात ठेवायची आहेत? या विषयावर महापालिकेकडून माहिती मागविण्यात आली आहे.

शासन अधिसूचना काढणार

सिंहस्थ कुंभमेळा काळात देश-विदेशातून लाखो भाविक आणि साधू-महंत दाखल होणार असल्याने स्थानिक सुरक्षितता, स्वच्छता आणि धार्मिक वातावरण राखण्यासाठी महापालिकेने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आपले मत, शिफारस आणि अभिप्राय त्वरित सादर करावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावरून याबाबत अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT