बिबट्यांमुळे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा वाढणार pudhari photo
नाशिक

Rural Schools Safety Issue : बिबट्यांमुळे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा वाढणार

प्राथमिक शिक्षण विभागाने तालुकास्तरावरून मागविला अहवाल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी असणाऱ्या सात निकषांपैकी एक असणाऱ्या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश (संबंधित उपवनसंरक्षक यांचा अहवाल) बिबट्याप्रवण क्षेत्र अथवा त्यांचा वावर असणारा दाखला मिळाल्यास संबंधित भागातील, गावातील प्राथमिक शाळाही अवघड क्षेत्रात बसण्यास पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील अलीकडच्या काही महिन्यांत अनेक तालुक्यांत बिबट्यांचा उपद्रव वाढला असून, यामुळे शाळांच्या वेळादेखील बदलण्यात आलेल्या आहेत. यामुळे यंदा बिबट्यामुळे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

यंदा अवघड क्षेत्रातील शाळा मार्च महिन्यापूर्वी अंतिम करण्यात येणार असून, यासाठी तालुकापातळीवरून अवघड क्षेत्रनिश्चिती करण्यासाठीच्या सातपैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकापातळीवरून मागवली आहे. ही माहिती आल्यावर जिल्हास्तरावर असणाऱ्या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात येणार आहेत.

दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांपूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात येतात. यासाठी शिक्षण विभागाने सात निकष ठरवून दिलेले आहेत. या निकषात नक्षलग्रस्त अथवा पेसा गाव क्षेत्रात असणारी गावे, वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारी गावे. महसूल विभागाच्या माहितीनुसार हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव (उपवनसंरक्षक यांचा अहवाल) वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारी गावे, तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव असणारी गावे (बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलसह अन्य कंपन्यांची मोबाइल नेटवर्क नसणारी गावे), डोंगरी भाग, राष्ट्रीय, राज्य मार्गापासून दहा किलोमीटरपेक्षा जास्त दूर असणारी गावे, या निकषांचा समावेश आहे.

यातील किमान तीन निकष पूर्ण करणाऱ्या गावातील प्राथमिक शाळा अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यात येणार आहे. या शाळांमधील शिक्षकांना बदल्यांमध्ये सवलत असल्याने अवघड क्षेत्रातील शाळांसाठी अनेक वेळा शिक्षक आग्रही असल्याचे दिसून आलेले आहे.

बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर

जिल्ह्यात अनेक तालुक्यांत विशेष करून नाशिक, दिंडोरी, सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, कळवण या ठिकाणी नदीच्या कडेला, उसाचे क्षेत्र असणाऱ्या भागात मागील काही महिन्यांमध्ये बिबट्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी जनावरांसह माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा भागातील अनेक शाळा सध्या अवघड क्षेत्रात समाविष्ट नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या जीवितांचा विचार करून या शाळा अग्रक्रमाने अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT