सिन्नर : सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ आठ महिन्यांचा बिबट्याचा बछडा ५५ फूट खोल विहिरीत पडून मृतावस्थेत आढळला.
गट क्र. ४१ मधील शेतकरी बंडू मारुती दराडे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट बछडा पडल्याची माहिती बुधवारी (दि.२२) दुपारी ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळवले. उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महेश वाघ, वनरक्षक आकाश रुपवते, फैजअली सय्यद, निखिल वैद्य, रोहित लोणारे आणि रामनाथ अगीविले यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अंदाजे दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा बछडा विहिरीत पडलेला असल्याची माहिती वन विभागाने दिली. मृत बछड्याला मोहदरी वन उद्यानात नेण्यात आले आहे.