Onion Market Price Pudhari
नाशिक

Onion Market Price: कष्ट आमचे, फायदा दुसऱ्याचा! कांद्याला मातीमोल भाव; लासलगावमधील शेतकरी संतप्त

Lasalgaon Onion Market Price | कष्ट आमचे, फायदा दुसऱ्याचा! कांद्याला मातीमोल भाव; लासलगावमधील शेतकरी संतप्त

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यासह नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले, तरी बाजारपेठेत मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल अत्यंत कमी दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च व हमाली खर्च वजा जाता हातात काहीच राहत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ९०० ते १२०० किलो कांदा विक्रीस नेल्यानंतरही खर्च भागवणे अवघड होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादनासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी व्यवस्थापन आणि वाहतूक यावर मोठा खर्च होतो. मात्र, बाजारातील घसरत्या दरामुळे हा सर्व खर्च वाया जात असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.

विशेषतः साठवणूक सुविधांचा अभाव, निर्यात धोरणातील अनिश्चितता आणि व्यापाऱ्यांवरील अवलंबित्व यामुळे परिस्थिती अधिक विकट बनली आहे. शेतकरी संघटनांनी केंद्र व राज्य सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यात निर्बंध हटवावेत तसेच बाजार हस्तक्षेप योजना प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी केली आहे.

तसेच कांदा उत्पादकांना थेट आर्थिक मदत देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लासलगावसह प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दरातील चढ-उतार कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. उत्पादन भरघोस असूनही योग्य मोबदला मिळत नसल्याने 'कष्ट आमचे आणि फायदा दुसऱ्यांचा' अशी भावना शेतकऱ्यांमध्ये तीव्र होत आहे.

कांदा उत्पादकांशी १८ मे रोजी रोहित पवार साधणार संवाद

कांद्याला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला असून, सरकार मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी रोहित पवार सोमवारी (दि. १८) लासलगाव येथे येणार आहेत. महाराष्ट्राच्या शेतकरी इतिहासात कांदा हे केवळ पीक नसून राज्याच्या अर्थकारण, राजकारण आणि जनजीवनाचा केंद्रबिंदू राहिले आहे. कांद्याचे भाव वाढले तर सरकार हादरते आणि भाव घसरले तर शेतकरी उद्ध्वस्त होतो, अशी परिस्थिती कायम दिसून येते.

कांदा विकून घर चालेल, कर्ज फेडता येईल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील, या आशेवर महिनोन्महिने शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती शेवटी निराशाच येत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांची घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी २५ गोण्या म्हणजेच १२६२ किलो कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. मात्र, विक्रीतून मिळालेल्या रकमेपेक्षा हमाली, तोलाई, वाराई, गोणी खर्च आणि इतर कपातींचा आकडा अधिक ठरला.

अखेरीस सर्व हिशेब झाल्यानंतर त्यांच्या हातात एक रुपयाही उरला नाही. उलट बाजार समितीचे शुल्क भरण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून १ रुपया द्यावा लागला. या व्यवहाराची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमदार रोहित पवार १८ मे रोजी लासलगाव येथे उपस्थित राहणार आहेत. १९ तारखेच्या आत या पाषाणहृदयी सरकारला पाझर फुटेल आणि सरकार या प्रश्नाकडे गांभीयनि लक्ष देईल, अशी अपेक्षा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली आहे.

कांदा पिकवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतो. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, बाजारात मिळणारा दर पाहता उत्पादन खर्चही निघत नाही. अनेक वेळा कांदा विकून हातात काहीच राहत नाही, सरकारने कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अन्यथा कांदा शेती करणे परवडणार नाही.
- राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT