Managaon Water Supply Scheme file photo
नाशिक

Lasalgaon Water Supply | लासलगावसह 16 गावांत 5 दिवसांपासून पाणीबाणी! नवीन डीआय पाइपलाइनचे काम वेगाने सुरू

Lasalgaon Water Supply | लोखंडी पाइपऐवजी डीआय पाइपलाइनचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव-विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेला वारंवार लागणारे गळतीचे ग्रहण सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे जुन्या लोखंडी पाइपलाइनऐवजी नवीन डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे गेल्या पाच दिवसांपासून लासलगावसह संबंधित गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती लासलगाव ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लासलगावसह १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेत गेल्या काही काळापासून वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. जुन्या लोखंडी पाइपलाइनला वारंवार गळती लागणे, पाइपलाइन फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच जॅकवेलपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी न पोहोचणे या कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी, नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जुन्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि नियमित करण्याच्या दृष्टीने जुनी पाइपलाइन बदलून नवीन डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने लासलगावसह संबंधित गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. सध्याचा त्रास तात्पुरता असला तरी नवीन पाइपलाइन काम पूर्ण झाल्यानंतर वारंवार होणारी पाणीगळती कमी होऊन पाणीपुरवठ्याचा दाब आणि नियमितता सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा:

नवीन डीआय पाइपलाइनचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, तसेच भविष्यात वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

"पाणीपुरवठा योजनेतील जुन्या लोखंडी पाइपलाइन बदलून नवीन डीआय पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. कामाच्या कालावधीत नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे."
संजय बाविस्कर, ग्रामविकास अधिकारी, लासलगाव ग्रामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT