लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून ११० कोटी रुपये निधीतून लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यात येत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांचा पाठपुरावा आणि समन्वयातून या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील १५ दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण होऊन लवकरच येथून वाहतूक सुरू होणार आहे.
या बाह्यवळण रस्त्यामुळे लासलगाव शहर आणि रेल्वे गेट येथे होणारी वाहतुकीची कोंडी कायमची सुटणार असून, या परिसरातील दळणवळण सुरळीत होणार आहे. लासलगावला कांद्याची बाजारपेठ असल्याने परराज्यातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी, रेल्वे गेट परिसरात वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतो.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव रेल्वे उड्डाणपूल आणि पोहोच रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. यासह बाह्यवळण रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलदेखील साकारण्यात आला. मात्र, टाकळी विंचूर परिसरातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित होता. परिसरातील जागेचा कायदेशीर पेच असल्याने या रस्त्याचे काम बंद पडले होते.
मंत्री भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीर भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून यात विशेष लक्ष घालत शेतकरी आणि प्रशासनात समन्वय घडवून आणला. शेतकरी आणि प्रशासनात बैठक घेत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला.
टाकळी-विंचूर परिसरात जमिनीबाबत कायदेशीर पेच असल्याने अॅड. उत्तम कदम यांच्या सहकार्यातून हा पेच सोडवून प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे दोन दिवसांत टाकळी-विंचूर बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे.
विंचूर भागातील भूसंपादन आणि रस्त्याचे उर्वरित काम पुढील १५ दिवसांत पूर्ण होऊन रस्ता वर्दळीस सुरू होऊ शकणार आहे. मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ४.८०० मीटर हा लासलगाव बाह्यवळण रस्ता असून, यासाठी रेल्वे उड्डाणपूल साकारला आहे.
भूसंपादनासह ११० कोटी रुपये निधीतून या रस्त्याची विकासकामे करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होताच हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. यामुळे लासलगाव रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.