Lasalgaon APMC Election 2026
लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेचा पट पुन्हा एकदा रंगला आहे. सभापती डी. के. जगताप आणि उपसभापती संदीप दरेकर यांनी आवर्तन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा दिला आणि त्याच क्षणापासून बाजार समितीच्या राजकारणात पडद्यामागील हालचालींना विलक्षण वेग आला आहे. कोण सभापती होणार, कोणाच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ पडणार आणि शेवटचा डाव कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय जयदत्त होळकर यांचे सभापती म्हणून नाव अग्रेसर आहे, तर पंढरीनाथ थोरे, सोनिया होळकर हे देखील स्पर्धेत आहेत. या संपूर्ण राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे हे 'रणनीतीकार' म्हणून चर्चेत आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी बाजार समितीच्या या निवडणुकीची सूत्रे खैरे यांच्या हाती दिली आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ मतदानाची नसून रणनीती, समन्वय आणि राजकीय गणितांची ठरण्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वीही सभापती निवडीवेळी ऐनवेळी राजकीय खेळी करत डी. के. (नाना) जगताप यांची बिनविरोध निवड घडवून आणण्यात खैरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे यावेळीही ते कोणता नवा डाव टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, थोरे गटाकडे दहा सदस्यांचे संख्याबळ असल्याने त्यांच्या भूमिकेला निर्णायक महत्त्व आले आहे. यातील सात सदस्य सध्या सहलीवर असल्याची चर्चा असून, उर्वरित सदस्यही सतत संपर्कात राहून पुढील रणनीती आखत असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती शुक्रवारी (दि. १०) नाशिक येथील भुजबळ फार्मवरील बैठकीची. या बैठकीला थोरे गटाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात असून, याच बैठकीत सभापती आणि उपसभापतिपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात "भुजबळ फार्मवरूनच बाजार समितीचा नवा चेहरा ठरणार का?" अशी चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत आकड्यांइतकीच महत्त्वाची भूमिका पडद्यामागील समन्वय, निष्ठा आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या राजकीय चालींची असणार आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या सत्तेची ही लढत आता केवळ निवडणूक राहिलेली नसून प्रतिष्ठा, नेतृत्व आणि प्रभाव सिद्ध करण्याची मोठी कसोटी ठरत आहे. आता सर्वांच्या नजरा शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे लागल्या आहेत. भुजबळांचा आदेश अंतिम ठरणार की शेवटच्या क्षणी पुन्हा एखादी नवी राजकीय चाल खेळली जाणार, याचे उत्तर पुढील काही तासांत मिळणार आहे. तोपर्यंत मात्र लासलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.