ठळक मुद्दे
राज्यातील विविध जि. प. मध्ये 1 हजार 183 लाभार्थी कर्मचाऱ्यांमध्ये 17 पुरुष कर्मचारी
नाशिक जिल्हा परिषदेतील दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा तर सहा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश
कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल करणार; आकडा वाढण्याची शक्यता
नाशिक : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील 1 हजार 183 लाभार्थी कर्मचाऱ्यांमध्ये 17 पुरुष कर्मचारी असून, यात नाशिक जिल्हा परिषदेतील दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा तर, सहा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल करण्याबरोबरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
विभागातील लाभार्थी कर्मचारी असे..
नाशिक - 8
नंदुरबार - 8
जळगाव - 7
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची गाजत-वाजत घोषणा केली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील विविध जिल्हा परिषदेतील 1 हजार 183 कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या लाभार्थींत महिला कर्मचारी असतील अशी अपेक्षा होती. परंतु, छाननी केल्यानंतर यात पुरुष कर्मचारी असल्याचेदेखील आता समोर आले आहे. 1 हजार 183 कर्मचाऱ्यांमध्ये 17 पुरुष कर्मचारी आहेत. या 17 कर्मचाऱ्यांमध्ये पुणे व सोलापूर जिल्हा परिषदेतील प्रत्येकी 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, नाशिक जिल्हा परिषदेत दोन कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे नावे अद्याप समोर आलेली नाहीत. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 8 कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे छाननी प्रक्रियेनंतर निदर्शनास आले आहे. त्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली असून, त्याआधारे या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात वयाच्या निकषात न बसणाऱ्या हजारो महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचेदेखील समोर आले आहे. सरकार गेल्या काही महिन्यांपासून बोगस लाभार्थी शोधून त्यांचा लाभ थांबवत आहे. येत्या काळात या प्रकरणी आणखी कडक कारवाई करण्याच्या तयारीत शासन असल्याचे दिसत आहे.