नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ओमकार पवार यांनी जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी, विद्यमान योजना सुरू ठेवण्यासोबतच त्यांनी कुपोषित बालक दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीव्र कुपोषणग्रस्त 412 बालकांना शासकीय कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दत्तक दिले जाणार आहे. याची सुरुवात पवार स्वतःपासून करणार आहेत.
सीईओ पवार यांनी विभागनिहाय आढावा घेतला. महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती, विविध योजना, तसेच गत सहा महिन्यांतील प्रकल्पनिहाय कुपोषित बालकांची संख्या यांचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या प्रकल्पात कुपोषण जास्त किंवा कमी आहे, त्याची कारणे आणि संख्येतील बदलाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. यात जून महिन्यात जिल्ह्यात 412 कुपोषित बालके आढळली असल्याचे सांगण्यात आले.
कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश पवार यांनी दिले. कुपोषित बालकांची संख्या लपवू नये आणि सर्व अधिकारी-कर्मचार्यांनी कुपोषणमुक्तीचा संकल्प करून एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, कुपोषित बालक दत्तक योजनेची संकल्पनाही त्यांनी मांडली.
कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. या दृष्टीकोनातूनच कुपोषित बालक दत्तक योजना राबविणार आहोत. यात सर्व शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक-एक कुपोषित बालक दत्तक घेण्याबाबत विनंती करणार आहे. अधिकाऱ्यांनी सहयोग दिल्यास कुपोषण कमी होण्यास मदत होईल. याची सुरूवात मी स्वतःपासून करणार आहे.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
पेठ : 21
हरसूल : 20
सुरगाणा : 30
बाऱ्हे : 11
इगतपुरी : 31
दिंडोरी :19
उमराळे :12
कळवण- 1 : 02
कळवण -2 :13
नाशिक : 40
त्र्यंबकेश्वर :18
देवळा : 09
बागलाण - 1 : 02
बागलाण - 2 : 09
सिन्नर- 1 : 02
सिन्नर- 2 : 04
निफाड : 25
मनमाड : 29
पिंपळगाव : 25
येवला -1 : 26
येवला-2 : 07
नांदगाव - 19
चांदवड-1 : 09
चांदवड-2 :16
मालेगाव :05
रावळगांव -08