

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखड्यावर 15 तालुक्यांतून सुमारे 63 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक हरकती या गट, गण सीमा निश्चितीच्या असल्याच्या सांगितले जात आहे. गट, गण रचना करताना भौगोलिक समतोल नसल्याचे, गावे चुकीच्या पध्दतीने घेतले गेले अशाही हरकती प्राप्त झालेल्या आहे. प्राप्त झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार असून अद्याप त्याची निश्चित नसली तरी पुढील आठवड्यात ही सुनावणी होऊ शकते असे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेचे प्रारूप १४ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आले. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढले असून त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले आहेत. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकतींच्या अंतिम दिवशी 21 जुलैपर्यंत एकूण 63 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यात तहसीलदार कार्यालयाकडे 44 तर, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 19 हरकतींचा समावेश आहे. यात सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यातून 19 तर, नाशिक तालुक्यातून 13 हरकती आल्या आहेत.
बागलाण, दिंडीरी, इगतपुरी या तालुक्यातून एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. प्राप्त हरकतीत गट, गण यांच्या सीमा निश्चितीवरच बहुतांश हरकती आहेत. गट व गण यांच्या सीमा निश्चित करताना घेतलेल्या गाव-वाड्या यावर काही हरकती आलेल्या आहेत. रचना करताना भौगोलिक समतोल साधला गेला नसल्याचे हरकती आहेत. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह प्रस्ताव २८ जुलैपर्यंत विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्यानंतर गट-गण रचनेचे अंतिम प्रारूप १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केले जातील.
मालेगाव - 12
देवळा - 3
कळवण - 1
सुरगाणा - 1
पेठ - 1
चांदवड - 5
नांदगाव- 3
येवला - 1
निफाड - 19
नाशिक - 13
त्र्यंबकेश्वर - 1
सिन्नर - 2