Kumbh Mela Minister Mahajan's inspection Janori
जानोरी : पुढारी वृत्तसेवा येथे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा चौकीची पाहणी केली. जानोरी हे नाशिक जिल्ह्यातील चार चौक्यांपैकी कुंभमेळ्याचे महत्त्वाचे स्थान आहे. येथे पुरातन काळात साधू महंत येत होते. कुंभमेळ्यात जानोरी येथे साधू मुक्कामी राहात होते. दिगंबर आखाड्याचे श्रीराम मंदिर असून, येथे कुंभमेळ्याची पर्वणी होत होती. परंतु, ती काही वर्षांनी बंद झाली. मात्र, जानोरी ग्रामस्थांनी साधू-महंत व प्रशासनाला पर्वणीविषयी माहिती दिली. त्यानंतर २०१४ च्या कुंभमेळ्यात जानोरी येथे दिगंबर व निर्मोही आखाड्याच्या साधू-महंतांनी ध्वजारोहण केले होते.
जानोरी हे पुरातन ऐतिहासिक तसेच कुंभमेळ्याचा वारसा लाभलेले गाव आहे. याच अनुषंगाने मंत्री गिरीश महाजन यांनी जानोरी बाणगंगा नदीकिनारी चौकीची पाहणी केली. यावेळी पायाभूत सुविधांसाठी काय करता येईल, याची माहिती घेतली. बाणगंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला घाट, सीता स्वयंवर मंदिरामागे बाणगंगा नदीवर पूल बांधणे गरजेचे आहे.
कुंभमेळ्यातील आखाडे जानोरी येथे पर्वणी तसेच ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे प्रशासन सर्व तयारी करणार आहे. जानोरी गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करून देणार आहेत. पायाभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. लवकरच जानोरीच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
या भेटीप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश विधाते, विलास काठे, गोरख घुमरे, प्रभाकर विधाते, दशरथ विधाते, रवि सूर्यवंशी, मधुकर काठे, भारत काठे, नरेंद्र केंग, शरद मळेकर उपस्थित होते.
जानोरी हे कुंभमेळ्यात चार चौक्यांपैकी महत्त्वाचे स्थान आहे. येथे एक पर्वणी होणार आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. विकासकामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी सूचना केल्या आहेत.योगेश तिडके, भाजप, जिल्हा उपाध्यक्ष