नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा, साधू-महंत आणि हिंदू धर्माबद्दल होणारी टीकाटिप्पणी योग्य नाही. आम्ही सहिष्णू आहोत, सहन करतोय. पण, दुसऱ्या धर्माबद्दल बोलून दाखवा, तुम्हाला ते रस्त्यावरदेखील फिरू देणार नाहीत, असा गर्भित इशारा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना दिला. साधुग्रामसह नाशिकच्या विकास प्रकल्पांसाठी काही झाडे तोडावीच लागणार आहेत. त्याबदल्यात १५ हजार झाडांची लागवड केली जात आहे. तुम्ही सांगाल ते करू, पण माझी हात जोडून विनंती आहे, नाशिकची बदनामी करू नका, असे आवाहनदेखील मंत्री महाजन यांनी केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाकवी कालिदास कलामंदिर येथे हरित कुंभाचा प्रारंभ तसेच विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मंत्री महाजन यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. ॲड. राहुल ढिकले, महंत भक्तिचरणदास महाराज, अंकित गुरुजी, सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक रुपयादेखील कमी पडू देणार नाही. हवा तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही देताना मंत्री महाजन यांनी तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित तसेच मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा समाचार घेतला. चार महिन्यांपूर्वी वृक्षप्राधिकरण समितीच्या परवानगीने मलनिस्सारण केंद्राच्या विस्तारीकरणासाठी झाडे तोडण्यात आली.
साधुग्रामसाठीही काही झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावर काही पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींकडून आक्षेप घेतला जात आहे. झाडे वाचली पाहिजे याविषयी दुमत नाही. परंतु एकीकडे आपण म्हणतो, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. मग मलनिस्सारण केंद्राच्या विस्तारीकरणासाठी झाडे तोडली, तर त्याला आक्षेप का? असा सवाल महाजन यांनी केला. तपोवनात गत सिंहस्थापेक्षा एकही अधिक तंबू उभारला जाणार नाही. परंतु त्यासाठी गेल्या दहा वर्षांत उगवलेली झुडपे हटवावीच लागतील. त्या बदल्यात 15 हजार झाडे, तीही १५ ते २० फूट उंचीची लागवड केली जात आहे. त्यातील एकही झाड मरू दिले जाणार नाही, याची आम्ही खात्री देतो, आंदोलकांनीही थोडे समजून घ्यावे. टीका करताना तारतम्य बाळगावे. नाशिकचा लौकिक खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महाजन यांनी केले. यावेळी आ. सीमा हिरे, माजी नगरसेविका प्रियंका माने यांनीही मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले. योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
राहुल ढिकले यांचे अभिनंदन
पंचवटीत राम काल पथ प्रकल्पात अनेक जुने वाडे, घरे, दुकाने बाधित झाली आहेत. बाधितांची अतिक्रमणे हटवून प्रकल्पाची वाट सुकर करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी प्रकल्पबाधितांची समजूत काढत त्यांच्या पुनवर्सनात मोलाची कामगिरी बजावली. याबद्दल कुंभमेळामंत्री महाजन यांनी आ. ढिकले यांचे अभिनंदन केले.
आंदोलनातून शहरी नक्षलवादी?
तपोवनात वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या धर्मविरोधी वक्तव्याचा समाचार घेताना आ. देवयानी फरांदे यांनी, आंदोलनाच्या माध्यमातून कोणी शहरी नक्षलवादाला खतपाणी घालत असेल, तर सरकारने त्याचा बिमोड करावा, असे विधान केले. साधू-महंतावर वादग्रस्त टीका आमच्या धर्मावर घाला घालण्याचा प्रयत्न असून, तो कदापि सहन करणार नाही, असा इशारादेखील आ. फरांदे यांनी दिला.
या प्रकल्पांचे भूमिपूजन
सिंहस्थांतर्गत २७६.५९ कोटींचे सात रस्ते, पूल
अमृत २ अंतर्गत १९० कोटींची मलनिस्सारण योजना
म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून २२५ कोटींची मलनिस्सारण योजना
राम काल पथ बाधितांच्या पुनर्वसनासाठी घरकुल पत्राचे वाटप
हरित कुंभांतर्गत १५ हजार झाडांच्या लागवडीचा प्रारंभ